उत्तर प्रदेशातही ‘कठुआ’कांड?, ८ वर्षीय मुलीची हत्या

सामना ऑनलाईन । एटा

जम्मू-कश्मीरमधील कठुआ, गुजरातमधील सूरत प्रकरणाने सगळ्या देशाला हादरवून सोडलं आहे. उत्तर प्रदेशातही अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं असून ८ वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. मृत्युपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी सोनू या १८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ही चिमुरडी तिच्या आईवडिलांसोबत उत्तर प्रदेशमधील एटा येथी एका गावातल्या लग्नसोहळ्याला आली होती. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास लग्नविधी सुरू होते. मुलीचे आई-वडील लग्नकार्यात व्यग्र होते. लग्नविधी आटपल्यानंतर काही वेळाने जेव्हा मुलगी गायब असल्याचं लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरू करण्यात आला. तेव्हा त्या मुलीचा मृतदेह जवळच्याच एका बांधकाम प्रवण इमारतीत सापडला.

मुलीच्या शरीरावरच्या खुणा पाहून पोलिसांनी मृत्युपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असावा असा अंदाज वर्तवला आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.