लकडावालाचा आर्थर रोडमध्ये ‘गेम’ होऊ शकतो, पोलिसांना भीती

1085
Gangster Ejaz Lakdawala

खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसारख्या अनेक गुह्यांची नोंद असलेला आणि पूर्वी डॉन दाऊद इब्राहिम तसेच छोटा राजन यांच्यासाठी काम करणारा कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला काही दिवसांपूर्वीच मुंबई क्राइम ब्रँचच्या हाती लागला. एजाजच्या जिवाला या दोघांच्या टोळीकडून जिवाचा धोका असून त्याची रवानगी दुसऱ्या कारागृहात करावी, अशी विनंती आर्थर रोड कारागृहाकडून कोर्टाकडे करण्यात आली आहे.

स्वतंत्र टोळी सुरू केल्यानंतर परदेशात लपून राहणारा एजाज काही दिवसांपूर्वीच पाटण्यात सापडला होता. खंडणीविरोधी पथकाने बिहार पोलिसांच्या मदतीने लकडावालाच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याला कोर्टात हजर केले असता 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. मात्र, आर्थर रोड कारागृहाचे निरीक्षक नितीन वायचळ यांनी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे पत्र लिहून त्याला तिथून दुसरीकडे पाठवण्याची विनंती केली आहे.

या पत्रानुसार, आर्थर रोड तुरुंगात 1993 बॉम्बस्फोट, 2006चे साखळी बॉम्बस्फोट, 26/11चा दहशतवादी हल्ला यांचे आरोपी कैद आहेत. याशिवाय मोक्का, पोटा आणि टाडा या कायद्यांतर्गत अटक झालेले अनेक आरोपीही आर्थर रोड कारागृहात कैद आहेत. 2010मध्ये कुख्यात गुंड अबु सालेम याच्यावर मुस्तफा डोसा याने चाकूसदृश हत्याराने हल्ला केला होता. 2016मध्येही गोपाळ शेट्टी आणि सलीम खान नावाच्या दोन आरोपींनी एकमेकांवर हल्ले केले होते. त्याचा संदर्भ देऊन वायचळ यांनी दाऊद किंवा छोटा राजनच्या टोळीतले गुंड लकडावालावर हल्ला करू शकतात, असं पत्रात म्हटलं आहे.

याखेरीज कारागृहाचे अनेक प्रश्न या पत्रात मांडले आहेत. आर्थर रोड कारागृहाची क्षमता कमी आहे. या कारागृहात कैद्यांसाठी खटला सुरू असलेल्या आरोपींसाठी 804 जागा उपलब्ध आहेत. पण, प्रत्यक्षात तिथे 3700 इतके कैदी राहतात. 40 ते 50 ची क्षमता असलेल्या एका बराकीत सध्या 250 ते 275 कैदी राहतात. त्या तुलनेने कैद्यांच्या मुक्ततेचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे कैद्याला न्यायालयीन सुनावणीसाठी किंवा वैद्यकीय तपासणीसाठी नेणे-आणणे जिकीरीचे बनले आहे. तसंच एका बराकीत प्रमाणापेक्षा जास्त कैदी असल्याने संसर्गजन्य आजारही लगेच बळावत आहेत. इतक्या प्रचंड संख्येमुळे कैद्यांमध्ये होणाऱ्या वादावादीचं प्रमाणही पुष्कळ वाढलं आहे. जर कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली तर तुरुंगात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे एजाज लकडावाला याला आर्थर रोड तुरुंगातून हलवून तळोजा कारागृहात ठेवावे अशी विनंती आर्थर रोड कारागृहाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या