‘मिंध्यां’कडून ‘आशा’, आरोग्य सेविकांना ठेंगा! पगारवाढ नाहीच, मागण्याही प्रलंबित

 मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन आरोग्यविषयक काम करणाऱया ‘आशा’ सेविका आणि आरोग्य सेविकांना मिंधे सरकारने पगारवाढीचे आश्वासन देऊनही केलेले नाही. शिवाय त्यांच्या अनेक मागण्या अजून प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या, 11 जून रोजी शेकडो ‘आशा’, आरोग्य सेविका आझाद मैदानात जोरदार धरणे आंदोलन करणार आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर लवकरच ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने दिला आहे.

‘आशा’, आरोग्य सेविकांनी कोविडसारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी काम केले. अशा ‘आशा’ सेविकांना केवळ 1650 तर आरोग्य सेविकांना 12 हजार रुपये पगार मिळतो. पगारवाढ आणि प्रलंबित मागण्यांसाठी ‘आशा’, आरोग्य सेविकांनी मार्चमध्ये आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना पाच हजार वेतन देण्याची घोषणा केली, मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप झाली नाही, तर आरोग्य सेविकांना न्यायालयाच्या आदेशानुसार किमान वेतन 18 हजार देण्याची मागणीही करण्यात आली, मात्र याबाबतही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात चार हजार आरोग्य सेविका व दोन हजार ‘आशा’ सेविका आंदोलन करणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास, सरचिटणीस ऍड. विदुला पाटील यांनी दिली आहे.

अशा आहेत प्रलंबित मागण्या

z न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 पासून किमान वेतन द्या.
z भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आदेशाची अंमलबजावणी
z आरोग्य सेविकांना वेंडर केले आहे ते रद्द करावे.
z संघटनेशी चर्चा केल्याशिवाय अतिरिक्त काम लादू नये.
z अतिरिक्त कामासाठी दुपटीने मोबदला देण्यात यावा.
z सर्व्हेचे काम शक्य नसल्यास सेविकांना ते देऊ नये.
z गटविमा किंवा 15 हजार वार्षिक विमा हप्ता द्यावा.