एकला चोलो रे…

300

ज्योत्स्ना गाडगीळ, [email protected]

गाण्याच्या शब्दांबरोबरच दोन अंतऱ्यांमधील सांगीतिक तुकडादेखील तुम्हाला गुणगुणण्याचा नाद आहे? तर तुम्ही कळत-नकळत ‘ऍकापेला’ ही कला अवगत करत आहात! संगीत वाद्यांचा हुबेहुब आवाज तोंडाने काढणे यालाच ‘ऍकापेला’ म्हणतात. ऋषभ गोखले या तरुण संगीतकाराने नुकत्याच प्रकाशित केलेल्या व्हिडिओतून ही कला अधोरेखित केली आहे.

गायक-नकलाकार सुदेश भोसले, ‘बोलक्या बाहुल्या’ सादरकर्ते रामदास पाध्ये, गायक-गायिकेच्या आवाजातील युगुलगीत एकाच गळ्यातून सादर करणारे साईराम अय्यर, बालविश्वातील कार्टुन्स कॅरेक्टर्सना आवाज देणारी मेघना एरंडे या सगळ्या कलाकारांमध्ये एक दुवा तुम्हाला समान असल्याचे आढळले असेल, तो म्हणजे त्यांनी आवाजाचा केलेला सदुपयोग! ‘ऍकापेला’ हीसुध्दा आवाजाच्या दुनियेत मुशाफिरी करण्याची एक सुवर्णसंधी आहे. त्यासाठी फक्त संगीताची उत्तम जाण आणि गळ्याची चांगली तयारी असावी लागते. परदेशात लोकप्रिय झालेली कला आपल्या देशात रुजत आहे. या परदेशी कलेत हिंदुस्थानी गाणे गुंफून संगीतकार ऋषभ गोखले ह्याने रवींद्रनाथ टागोर ह्यांना आदरांजली वाहिली आहे.

‘जोदी तोर डाक शोने क्यू नाशे, तोबे एकला चोलो रे…’

‘कोणीही तुमच्या मदतीला धावून येत नसेल, तर एकट्याने पुढच्या प्रवासाला सुरुवात करा’ असा ‘शो मस्ट गो ऑन’ चा संदेश देणारे, हिंदुस्थानचे पहिले नोबल पारितोषिक विजेते, रवींद्रनाथ टागोर यांची ७ मे रोजी १५६ वी जयंती झाली. त्यांचे काव्य, साहित्य आणि संगीत एवढय़ा वर्षांनंतरही अभ्यासले जात आहे. त्यात ‘एकला चोलो रे’ हे त्यांचे गाणे तर अतिशय लोकप्रिय आहे.

‘ऍकापेला’ या कलेबद्दल ऋषभला माहिती होती, पण ‘आला वर्दी’ नावाच्या ऍकापेला आर्टिस्टच्या ‘पहला नशा’ गाण्याने त्याला भारावून टाकले. गिटार, ड्रम्स, बास, पियानो, स्ट्रिंग्स, पाण्यातील बुडबुडय़ांचा आवाज, टाळ्या, बिटबॉक्स, महिला कोरस आणि गायकाचा आवाज एकटय़ाने ‘आला वर्दी’ने काढला आहे. तेव्हापासून ऋषभही हिंदुस्थानी संगीतातील विविध वाद्यांचे आवाज तोंडाने करण्याचा सराव करू लागला.

वादक तौफिक कुरेशी यांना आपण अनेक चर्मवाद्यांचे आवाज तोंडाने काढताना ऐकले आहे. त्याला बिटबॉक्सिंग म्हणतात. तसे करणारे अनेक कलाकार आज घडत आहेत. पण त्या धरतीवर ऍकापेलाचे वेगळेपण म्हणजे पियानो, गिटार, सतार, बासरी यासारख्या अवघड वाद्यांचे आवाज काढणे आणि त्यावर गाण्याचे संगीत वाजवणे. त्यासाठी खूप मेहनत लागते. ऋषभच्या गाण्यांमध्ये या वाद्यांचा समावेश आढळतो. सध्या तो ‘ऍकापेला’बरोबरच जाहिरातींच्या जिंगल्सचे ऑडिओ-व्हिडिओ एडिटिंग, इंग्रजीत स्क्रिप्ट रायटिंग करतो.

ऋषभने ऑडिओ इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे, तसेच संबंधित क्षेत्रातील कामाचाही त्याच्याकडे अनुभव आहे.

या गाण्याची निवड करण्यामागचे कारण विचारले असता ऋषभ सांगतो, ‘हे माझे अतिशय आवडते गाणे आहे, गाण्यातील शब्दांप्रमाणे थोडा वेगळा प्रयोग म्हणून गाण्याचे रेकॉर्डिंग, १७ वाद्यांचे आवाज, एडिटिंग आणि माथेरानच्या परिसरात माझ्या सेलफोनवर मी माझे शूटिंग केले आहे. नंतर ते शिताफीने एडिट केल्यामुळे मी स्वतः स्वतःचे चित्रिकरण केले असल्याबाबत लोक अजूनही साशंक आहेत. पण एकूणच गाण्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. यात प्रसिद्धी मिळवणे हा हेतू नव्हता, तर निव्वळ स्वांतसुखाय केलेला प्रयोग होता. तो यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे.’

ऋषभमुळे एक नवीन कला अधोरेखित झाली आहे, शिवाय टागोरांच्या गाण्यालाही उजाळा मिळाला आहे. http://www.youtube.com/soundlessound हे त्याचे युटय़ूब चॅनेल आहे. इथे तुम्ही हा नवा आविष्कार बघू शकता.

 

आपली प्रतिक्रिया द्या