नाशिकचा ‘एकमुखी दत्त’

सामना ऑनलाईन । नाशिक

महाराष्ट्रात पंढरपूर, मिरज, श्रीनिरंजन रघुनाथांचे जन्मग्राम अंकुल व नाशिक या क्षेत्रस्थानी एकमुखी दत्तात्रेयांची मंदिरे आहेत. त्यापैकी नाशिक येथील एकमुखी दत्तत्रेयांचे मंदिर गोदावरी नदीच्या पश्चिम काठावर आहे. हे स्थान प्रतिगाणगापूर म्हणून ओळखले जाते.

नाशिक येथील एक नागरिक श्री. वामन सखाराम बर्वे यांना स्वप्नात असा दृष्टान्त झाला की, गोदावरी नदीच्या व्हिक्टोरिया पुलाखाली असलेल्या पवित्र कुंडात एक दत्तमूर्ती आहे. ती कुंडातून बाहेर काढून तिची प्रतिष्ठापना करावी. त्या दृष्टांतानुसार श्री. बर्वे यांनी त्या कुंडातील मूर्ती महप्रयासाने बाहेर काढली व तिची गोदावरीच्या पश्चिम काठावर असलेल्या एका मठात प्रतिष्ठापना केली. त्याच मठाला पुढे मंदिराचा आकार देण्यात आला.मंदिरातील दत्तमूर्ती स्वयंभू असून वाळूची आहे. तिला एक मुख व सहा हात आहेत. सहा हातांत शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ व रुद्राक्ष माळ अशी आयुधे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या