फडणवीस, महाजन भेटले तरीही खडसे घुश्शातच!

2517

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वार्थी राजकारणाचा बुरखा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन फाडला. यानंतर स्वतःच्या डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीस आणि महाजन या जोडगोळीने प्रयत्न सुरू केले आहेत. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी खडसे यांची भेट घेऊन आणि त्यांच्या मर्जीतील उमेदवार देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही खडसे यांचा राग शांत झालेला नसून ते घुश्शातच असल्याचे दिसून येत आहे.

आमच्यात सर्व आलबेल – महाजन

आमच्यात सर्व काही आलबेल असून पूर्वीप्रमाणेच आम्ही सर्व एक आहोत. संवाद व्यवस्थित न झाल्याने आमच्यात अडचणी आल्या होत्या, मात्र आता सर्क ठीक आहे. नावे जास्त असल्याने आम्ही फडणवीस यांच्याशी चर्चा करून नावे निश्चित केल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

मी माझ्या भूमिकेवर ठाम – खडसे

फडणवीस यांच्याशी फक्त जिल्हा परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली. इतर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. फडणवीस आणि महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत काय, असा प्रश्न पत्रकारांनी खडसे यांना केला असता तुम्हाला सांगून समजत नाही का, असा संताप व्यक्त करत मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतःचे राजकारण सरळ करून घेण्यासाठी आपल्याला राजकारणातून संपविण्याचा डाव फडणवीस आणि महाजन यांनी जाणीवपूर्वक आखला. फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण करून स्वतःच्या पक्षाचे उमेदवार पाडले असे गंभीर आरोप करत खडसे यांनी फडणवीस यांच्या विरोधातील पक्षांतर्गत नाराजीला तोंड फोडले आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद अधिक उफाळून येण्याच्या भीतीने राज्यातील भाजप नेत्यांनी नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

खडसे यांनी फडणवीस यांच्यावरच थेट आरोप केल्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांना तातडीने खडसे यांच्या भेटीसाठी जळगावला पाठवले. नंदुरबार व धुळे जिह्याच्या दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने खडसे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या