अटक केली नाही म्हणून काही आभाळ कोसळणार नाही! खडसेंच्या याचिकेवरून हायकोर्टाने ईडीला फटकारले

भोसरी एमआयडीसी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची चौकशी करणाऱया अंमलबजावणी संचनालयाला (ईडी) मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच फैलावर घेतले. याचिकाकर्ते तपास यंत्रणांना योग्य ते सहकार्य करत आहेत असे असताना त्यांना अटक करण्याची गरज काय, असा सवाल करत हायकोर्टाने ईडीला फटकारले एवढेच नव्हे तर अटकेपासून संबंधितांना काही दिवस दिलासा दिला म्हणून आभाळ कोसळणार नाही असा टोलाही लगावला.

मंत्रिपदाचा गैरवापर करत कमी किमतीत पुणे, भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत. या प्रकरणी सहकार्य करत खडसे ईडी कार्यालयात हजर झाले तेथे त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली. ईडीने ऑक्टोबर महिन्यात खडसेंविरोधात ईसीआयआर दाखल केल्याने खडसेंनी याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. खडसेंच्या वतीने अॅड. आबाद पोंडा यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की ईडीकडून राजकीय दबावापोटी चौकशी सुरू करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट पुणे कोर्टात सादर केला आहे. ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी हा दावा फेटाळून लावला व कोर्टाला सांगितले की पुणे सत्र न्यायालयाने अद्यापही हा क्लोजर रिपोर्ट दाखल करून घेतलेला नाही त्यामुळे हे प्रकरण सुरूच आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर याचिकाकर्ते सहकार्य करत असताना त्यांना अटक करण्याची गरज काय याचा जाब ईडीला विचारला त्यावेळी ईडी ने 25 जानेवारीपर्यंत खडसे यांना अटक करणार नाही याची हमी दिली. त्यानंतर खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

हायकोर्ट काय म्हणाले?

  • आरबीआय, सीबीआय, ईडीसारख्या स्वायत्त संस्थांनी पुठल्याही दबावाखाली काम करू नये.
  • अशा तपास यंत्रणांनी स्वतंत्रपणे काम केले पाहिजे.
  • खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा इतका विरोध का?
आपली प्रतिक्रिया द्या