खडसेंसारख्या निष्ठावंतांवर अशी वेळ येणं हे दुर्दैवी! नितीन गडकरींची खंत

भाजप पक्षाचा विस्तार करण्यात एकनाथ खडसे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून काम करणाऱ्या खडसे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अशी वेळ येणं हे दुर्दैवी आहे अशी खंत भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. भाजपमध्ये वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे या सारख्या नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. ही नाराजी थोपवण्याचा प्रयत्न राज्यातील नेत्यांकडून चालू असतानाच नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाल्याचे मत उघडपणे व्यक्त केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र काम केले आहे. पक्षाचा विस्तार करण्यात खडसे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अतिशय प्रतिकूल काळात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात त्यांनी मोठा काम केलं. पक्षाला यश मिळवून दिलं. मात्र आज आज त्यांना दिली जाणारी वागणूक दु:खद आहे. पक्षाशी निष्ठा ठेवून इतकी वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर वा नेत्यावर ही वेळ येणं चांगलं नाही. त्याबद्दल मी फक्त दुःख व्यक्त करू शकतो, त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही. अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या