ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या घरी खलबते, भाजपमधील नाराज आणि ओबीसी नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

2475

राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पक्षांतर्गत गटबाजीला वाचा फोडल्यानंतर भाजपमधील नाराज आणि ओबीसी नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजांचे नेतृत्व करावे यासाठी त्यांना गळ घातली जात असून गेल्या दोन दिवसांपासून खडसे यांच्या घरी यासंदर्भातील खलबते सुरू आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपने ओबीसी नेत्यांना डाकलले. एक तर त्यांना तिकीट दिले नाही आणि ज्यांना तिकीट दिले त्यांना भाजपमधील गटाने पाडल़े  पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवास भाजपमधीलच लोक जबाबदार असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी बुधवारी फडणवीस यांच्या नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आज 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून डावलण्यात आलेले माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह जे. डी. तांडेल, दशरथ पाटील, आनंद देवरे या ओबीसी नेत्यांनी खडसे यांची भेट घेऊन साधारण दीड तास चर्चा केली.

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची गळचेपी होत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची सर्व ताकद खडसे यांच्या मागे उभी करू असा इशारा यावेळी देण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत सर्व ओबीसी नेते मिळून भाजपमध्ये होत असलेल्या अन्यायासंदर्भात बैठक घेणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी खडसे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची बुधवारी भेट घेऊन पक्षांतर्गत घडामोडींवर चर्चा केली. पक्ष नेतृत्वाकडून विधानसभा निवडणुकीत डावलण्यात आलेल्या भाजप बंडखोरांचा या दोन्ही नेत्यांवर वाढता दबाव आणि पक्षातील नाराजी यासंदर्भात या दोघांत चर्चा झाल्याचे समजते. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोके वर काढले असून भाजपचे ज्येष्ठ नेते थेट माध्यमांसमोर येऊन पक्षनेतृत्वार टीका करू लागल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये  वर्षानुवर्ष ओबीसी नेत्यांची गळचेपी सुरू आहे. अण्णा डांगे, ना. स. फरांदे, महादेव शिवरकर, गोपीनाथ मुंडे आदी नेत्यांवर गेल्या पंधरा वर्षांत अन्यायच झाला. आता कुठे तरी हे थांबविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही खडसे यांची भेट घेतली. तसेच याकरिता  भाजपच्या इतर नेत्यांची पण भेट घेणार आहोत- प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते

एकनाथ खडसेंवर अन्याय – थोरात

भाजपमधील नाराज आमदार व नेत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,  भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय केला आहे. भाजपमध्ये कर्तृत्ववान नेत्याला दूर लोटले जात आहे. भाजपने कारण नसताना एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित  या नेत्यांची तिकिटे कापली अशी टीकाही थोरात यांनी केली. भाजपमधील नाराज आमदार पुन्हा आघाडीत परतणार असल्याच्या चर्चेबद्दल बोलताना थोरात यांनी भरती जेवढी मोठी तेवढीच ओहोटीही मोठी असते असा टोला भाजपला लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या