माझं आणि मुख्यमंत्र्यांचं ठरलंय!

सामना ऑनलाईन, मुंबई

सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचं काम हे विरोधी पक्षनेत्याचं असतं. मी विरोधी पक्षनेता असताना  सरकारविरोधात जे वातावरण निर्माण झालं त्यात भाजपचं सरकार येण्यात  माझाही खारीचा वाटा आहे अशी खदखद व्यक्त करताना भाजप नेते एकनाथ खडसे यांनी ‘जे झालं ते झालं, जे काही घडलंय ते मी आणि मुख्यमंत्री आमच्या दोघांतच आहे. माझं आणि मुख्यमंत्र्यांचं ठरलंय पुढे काय करायचंय ते. पण जे ठरलंय ते सांगणार नाही’ असा टोला त्यांनी  लगावला.

विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उभे राहिलेल्या एकनाथ खडसे यांनी एकाच वेळी राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. अर्धं आयुष्य विरोधी पक्षात गेलं. विरोधी पक्षनेत्याचे गुण अजूनही बाहेर येत आहेत. त्यामुळे विसरून जातो की आता सत्ताधारी आहे. कधी कधी आमच्या मंत्र्यांविषयीही बोलतो. पण त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समजू नये की मी विखे-पाटलांची परंपरा सुरू ठेवीन. मी पक्षातच राहीन, असे खडसे म्हणाले.

विखे-पाटील भाग्यवान
राधाकृष्ण विखे-पाटील हे भाग्यवान आहेत. विरोधी पक्षातून येऊन थेट तिसऱ्या स्थानावर बसले. कॅबिनेट मंत्री झाले. गिरीश महाजन आता आलेत. पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवार हे निर्णय प्रकियेत दिसायचे, आता ते दिसू लागले आहेत. सुधीर मुनगंटीवार तर थेट पाचव्या स्थानावर गेले आहेत अशी जोरदार फटकेबाजी खडसे यांनी केली. विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटवला, पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला आणि सत्तेत का आले ते कळलं नाही. आई म्हणते ‘बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उतराई’ तसं आता वडेट्टीकारांना विखेंना म्हणावं लागेल ‘तुझा होऊ कसा उतराई’ अशा मिष्कील शैलीत खडसे यांनी वडेट्टीवारांचं अभिनंदन केलं.

मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलंय ते सांगा
खडसे मुख्यमंत्री आणि माझं ठरलंय असं सांगत असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आता ते तरी उघड करू नका असं सांगितलं. यावर गुलाबराव पाटील यांनी काय ठरलंय ते सांगा अशी विनंती केली. यावर खडसे यांनी तुमचं काय ठरलंय ते सांगा, युतीत मुख्यमंत्री कोणाचा होणार हे सांगून टाका म्हणजे वादावादी होणार नाही. मुख्यमंत्री तसेच उद्धवजी सांगत नाहीत तोपर्यंत ते बाहेर येणार नाही. तेव्हा जे काही ठरलंय ते सांगा असे एकनाथ खडसे म्हणाले.