विरोधकांना शत्रूसारखी वागणूक देण्यात येत आहे; एकनाथ खडसे यांचा सरकारवर हल्लाबोल

ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. राज्यात सध्या विरोधकांना शत्रूसारखे वागवण्यात येत आहे. त्यांच्यामागे ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणा मागे लावल्या जात आहेत. अशाप्रकारे तपास यंत्रणा पाठीमागे लावून विरोधकांना छळण्याचे प्रकार घडत आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सध्या राज्यात सुरू असलेल्या जाती-पातीच्या राजकारणाबद्दल विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले, प्रत्येक पक्षात राजकीय जातीयवाद फोफावला आहे. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. पण जातीभेदापेक्षा महत्त्वाची बाब अशी आहे की, समोर जे विरोधी पक्षात आहेत, त्यांना शत्रूसारखे वागवले जात आहे. विरोधी पक्षातील नेता अगदी आपला शत्रू आहे, असे समजून त्याच्यामागे ईडी, सीबीआय, सीआयडी किंवा भ्रष्टाचार विरोधी पथक अशा तपास यंत्रणांची चौकशी लावली जाते. अशाप्रकारे विरोधकांना छळण्याचे प्रकार घडत आहेत. विरोधकांना नाउमेद करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.