चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाची मलाही उत्सुकता – एकनाथ खडसे

1622
eknath-khadse

भाजपचे नेते, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मेळावा होत आहे. मात्र यंदाच्या मेळाव्यात परळी विधानसभा मतदार संघात पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे विशेष लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांना स्वकीयांनीच गद्दारी केल्याने परभव स्वीकारावा लागला अशी चर्चा आहे. त्यामुळे त्या नाराज असल्याचेही बोलले जात आहे. भाजपमधील नाराज नेते पंकजा मुंडे यांच्यासोबत आज असणार आहेत. तर त्याच वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकात पाटील पहिल्यांदाच गोपीनाथ गडावर येणार आहेत. त्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘दरवर्षी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष हे याठिकाणी येतात. मात्र चंद्रकांत पाटील आता प्रदेशाध्यक्ष झाले आहेत आणि पहिल्यांदाच ते अशा कार्यक्रमाला येताहेत. मलाही ते काय बोलणार याची उत्सुकता आहे’, असं एकनाथ खडसे म्हणाले.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘मागचे पाच वर्ष आम्ही आमचं सरकार असताना येत होतो. आता सरकार नसताना येत आहोत’. ‘मला वाटतं की, या ठिकाणी सरकारमध्ये असताना आमच्या पक्षाचे कार्यकर्ते कामात व्यस्त असायचे, काही नेत्यांनाही थोडा वेळ मिळत नव्हता. आता वेळही आहे, त्यामुळे सारे जण आनंदाने येताहेत’, असा चिमटाही त्यांनी भाजपच्या नेत्यांना काढला आहे.

जो होना है वो होता है!

एकनाथ खडसे आज अधिक प्रसन्न दिसण्याचं कारण काय असा प्रश्न विचारल्यावर ‘मी नेहमी प्रसन्न असतो. राजीनामा दिला तेव्हा देखील माझ्या चेहऱ्यावर दु:ख नव्हतं. जो होना है वो होता है’, असं एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांच्यासह प्रकाश मेहता हे देखील उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या