‘रामटेक’वरून बदनाम करणे आता तरी थांबवा!

30

सामना ऑनलाईन। नागपूर

मंत्री पद गेल्यानंतरही शासकीय निवासस्थान ‘रामटेक’ बंगला वापरल्याचे साडे पंधरा लाख रुपये भरा, अशी आठवण  सार्वजनिक बांधकाम विभागाने भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करून दिली असून याबाबतचे स्मरणपत्र त्यांना देण्यात आले. या विषयाबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पत्रकारांनी खडसे यांना छेडले असताना ‘रामटेक’ बंगल्यावरून बदनाम करणे आतातरी थांबवा, अशी जाहीर विनवणी त्यांनी पत्रकारांनाच केली!

माहितीच्या अधिकारात अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही माहिती मिळवली होती. खडसे यांनी ४ जून २०१६ रोजी राजीनाम्यानंतर १९ जून २०१६ रोजी त्यांना बंगला रिक्त करणे आवश्यक होते. माजी मंत्र्यांना पहिले १५ दिवस शासकीय निवासस्थान निःशुल्क असते. त्यानंतर ३ महिन्यांसाठी शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फूट ५० रुपये आणि त्यानंतर पुढील ३ महिन्यांसाठी १०० रुपये एवढा दंडनीय आकार निश्चित केला आहे. रामटेक बंगला वापरल्यापोटी १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत थकबाकी १५ लाख ४९ हजार ९४५ रुपये आहे. यावर बोलताना दोन खात्यांच्या प्रश्नामध्ये मला उगाच का बदनाम करता? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी केला. मला हा बंगला सामान्य प्रशासन विभागाने अलॉट केला होता व मी त्यांनाच तो परत केला. सार्वजनिक बांधकाम विभागाला मध्ये पडायचे काहीच कारण नव्हते. ‘आम्हाला कळवायला पाहिजे’ असे बांधकाम विभागाचे मला सांगणे म्हणजे ‘कहर’ आहे. तुम्ही मला बंगला नाही दिला, मग मी तुम्हाला बंगला कसा परत करू शकतो? तुमचा रेकॉर्ड तुम्ही दुरुस्त करा असा सल्ला ही बांधकाम विभागाला त्यांनी यावेळी दिला. मात्र ‘बंगला आमच्याकडे का नाही दिला?’ बांधकाम विभागानी अशी तक्रार करणे योग्य नाही असे ते म्हणाले. ‘मी बंगला कधीचाच परत केला आहे’ तुम्हीच पत्रकारांनी आता हे वृत्त छापा असे एकनाथ खडसे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या