अयोध्येतील राममंदिर हे एक माझ्या पराभवाचे कारण; सदाशिव लोखंडे यांनी अपयशाचे मांडले अजब तर्कट

‘अयोध्येमध्ये बांधण्यात आलेले राममंदिर हे एक माझ्या पराभवाचे कारण आहे’, असे सांगत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलताना खळबळ उडवून दिली आहे. लोखंडे यांच्या या अजब तर्कटामुळे नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे.

अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचा भाजपला राजकीय फायदा होणार, असे गणित मांडले जात होते. विरोधकांकडून यासंबंधी आरोपही केले जात होते. मात्र, शिर्डीतील मिंधे गटाचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी वेगळाच आरोप केल्यामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.

शिर्डीत आपला पराभव का झाला, काय कारणे असावीत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, लोखंडे म्हणाले, ‘अयोध्यामध्ये बांधण्यात आलेले राम मंदिर हेही एक माझ्या पराभवाचे कारण आहे. कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघात रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठय़ा संख्येने आहे. त्यांना राम मंदिर रुचले नाही,’ असे लोखंडे यांनी सांगितले.

मिंधे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला. लोखंडे मूळचे जामखेड तालुक्यातील आहेत. पूर्वी ते कर्जत-जामखेडमधून आमदार होते. त्यामुळे अलीकडेच त्यांनी कर्जतला भेट दिली. त्यावेळी लोखंडे बोलत होते.

लोखंडे म्हणाले, शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा असून, तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला. याशिवाय त्या मतदारासंघात राजकीय गट-तट मोठे आहेत. कारखानदारांच्या साम्राज्याचे गट-तट आहेत. त्यांच्यात कमालीचा संघर्ष आहे. त्यांच्या संघर्षात माझा बळी गेला, असे सांगून लोखंडे यांनी नाव न घेता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना टोला लगावला.