एकनाथ शिंदेंच्या नशिबी पुन्हा दिल्ली दरबारी ‘वेटिंग’च, दिवसभर वाट पाहूनही पंतप्रधानांची भेट नाहीच

शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले असले तरी दिल्लीदरबारी त्यांच्या अपमानाची सुरू असलेली परंपरा अजूनही खंडित झालेली नाही. गेल्या दिल्ली दौऱयावेळी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र सदनातच वेटिंगवर राहावे लागले होते. यावेळीही दोन दिवस मुख्यमंत्री दिल्लीत असताना त्यांना साधी पंतप्रधानांकडची वेळही मिळू शकली नाही.

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱयावर आहेत. शिवसेनेच्या काही राज्यांतील पदाधिकाऱयांना पह्डून शक्तिप्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न बुधवारीच शिंदे गटाने महाराष्ट्र सदनात केला होता, मात्र तरीही त्यांचे दिल्ली दरबारातील वजन काही वाढलेले दिसले नाही. बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांना पेंद्रीय गृहमंत्र्यांची उशिरा वेळ मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर आज दिवसभर मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेणार, अशा बातम्या पेरण्यात आल्या होत्या, मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून साधी भेट मिळेल की नाही हेही कळविण्यात आले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

वकिलांशी चर्चा आणि संभाजीराजेंची भेट

पंतप्रधान कार्यालयाकडून भेटीची वेळ मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे पुष्कळ फावला वेळ असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात वकिलांशी चर्चा केली आणि त्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली. मंत्रालयात संभाजीराजेंना ताटकळत ठेवल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. फावल्या वेळात मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

रश्मी शुक्ला भेटीला

वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. भेटीचे प्रयोजन समजू शकले नाही.

फॉक्सकॉनमुळे नाक कापले
पुण्याजवळ होणारा फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यात संतापाची लाट आहे. या प्रकल्पाच्या तोडीचा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात आणू, अशा राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. असा प्रकल्प आणण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जात आहे, अशाही बातम्या चालविण्यात आल्या. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांचे साधे मुखदर्शनही झाले नाही.

निकालाची धास्ती

सर्वोच्च न्यायालयात होणाऱया सुनावणीबाबत शिंदे गटात धास्तीचे वातावरण आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयातील निर्णयानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ होण्याचीही चिन्हे आहेत. त्या दृष्टीनेही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.