लोकशाहीच्या सोहळ्यातील खरे हीरो! वयाची शंभरी गाठलेल्या ज्येष्ठांनी, कॅन्सरग्रस्त रुग्णांनी बजावला हक्क

492

मतदान म्हणजे लोकशाहीच्या सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचे पर्व मानले जाते. राज्यात दुपारपर्यंत मतदान थोडेफार कासवगतीने सुरू असले तरी या सोहळ्यातील खरे हीरो ठरले आहेत ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेले वयाची शंभरी गाठलेले ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण. व्हिलचेअरवर बसून, वॉकर किंवा काठीचा आधार घेत कुटुंबियांच्या मदतीने मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर लोकशाहीतील या हीरोंनी मतदानाचा हक्क बजावला.

कॅन्सरग्रस्त रुग्णाचे पत्नीसह मतदान
पाच वर्षांतून एकदाच मिळणारा मतदानाचा हक्क बजावून एका कॅन्सरग्रस्त रुग्णाने इतरांना प्रेरणा दिली. मंगेश म्हात्रे असे या रुग्णाचे नाव असून आजारी असूनही त्यांनी पत्नी शुभांगीच्या मदतीने मतदान करून जबाबदार नागरिक असल्याचे दाखवून दिले.

खन्नाजी आजचे हीरो
मुंबईतील एका मतदान केंद्रावर 93 वर्षीय खन्ना नावाच्या आजोबांनी मतदान केले. या आजोबांसोबत केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी फोटो काढला व ‘खन्नाजी आजचे हीरो’ असल्याचे त्या म्हणाल्या. खन्नाजी हे सैन्य दलात कार्यरत होते.

शंभरी गाठलेले राम शर्मा
वयाची शंभरी गाठलेले पणजोबा राम शर्मा यांनी भांडुप पूर्व येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. कोणाच्याही मदतीशिवाय काठी टेकवत ते एकटेच मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. मतदान केल्यानंतर बोटावरील शाईची खूण दाखवत त्यांनी छायाचित्रकारांना पोजही दिली.

अविनाश महातेकरांच्या 90 वर्षीय आईने केले मतदान
कुर्ला येथे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या 90 वर्षीय आईने मतदानाचा हक्क बजावला. चालता-फिरता येत नसल्याने त्या व्हिलचेअरवर बसून मतदान केंद्रात दाखल झाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या