निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीयेत, किडनी विकायची परवानगी द्या!

सामना ऑनलाईन । भोपाळ

सध्या लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच रणधुमाळी सुरू आहे. जो तो उमेदवार मत मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. पण या दरम्यान एक उमेदवार वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. कारण, त्याने निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत म्हणून निवडणूक आयोगाकडे किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे.

किशोर समरीते असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. किशोर हे मध्य प्रदेशातल्या बालाघाट मतदारसंघाचे माजी आमदार असून आता पुन्हा तिथूनच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्याच्या खर्चाची कमाल मर्यादा 75 लाख रुपये इतकी आहे. पण, निवडणूक लढवण्यासाठी पैसेच नसल्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे किडनी विकण्याची परवानगी मागितली आहे. तसं शक्य नसेल तर निवडणूक आयोगाने त्यांना 75 लाख रुपये द्यावेत किंवा कर्जाची व्यवस्था करावी अशी विनंतीही समरीते यांनी केली आहे.

समरीते हे 10 वर्षांनंतर निवडणूक लढवत आहेत. निवडणूक प्रक्रिया ही दर खेपेगणिक अधिक महाग होत चालली असून सामान्य माणसाला निवडणूक लढवणं शक्य होत नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. किशोर समरीते यांच्या मागणीवरून सध्या राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अर्थात समरीते यांची ही प्रकाशझोतात येण्याची पहिली वेळ नाही. यापूर्वीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती.