लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-कश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज जम्मू-कश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-कश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर असे तीन टप्प्यांत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर आणि झारखंड विधानसभेची मुदत जानेवारी महिन्यात संपत असली तरी तूर्त येथे निवडणुका होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत जम्मू-कश्मीरमध्ये लोकांचा उत्साह दिसून आला. तेथील लोकशाही व्यवस्थेसाठी जनता उत्सुक असून लोकांना बदल हवा असल्याचे दिसून येत आहे, असे राजीव कुमार म्हणाले. जम्मू-कश्मीरमध्ये याआधी विधानसभेच्या जागांची संख्या 87 होती ती वाढून आता 90 झाली आहे. जम्मूमध्ये 43 व कश्मीरमध्ये 47 जागा असतील. पाकव्याप्त कश्मीरसाठी विधानसभेच्या 24 जागा राखीव आहेत. त्या सोडून 90 जागांवर निवडणूक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मू-कश्मीर
– जम्मू-कश्मीरमध्ये 2014 पासून निवडणुका झालेल्या नाहीत. 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर येथे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.
– जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर तेथे नायब राज्यपाल प्रशासक आहेत. आता दहा वर्षांनंतर त्या राज्यात निवडणूक होणार आहे.
– जम्मू-कश्मीरमध्ये निवडणूक घेण्याची तेथील राजकीय पक्षांची मागणी होती. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती.
– जम्मू-कश्मीरात 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुकीचा निर्णय घ्या, त्याचे नियोजन करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले होते.
हरियाणा
– हरियाणात 2019 मध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यामध्ये 90 पैकी भाजपला 41, तर जेजेपीला 10 जागा मिळाल्या.
– भाजपने जेजेपी आणि अपक्षांना सोबत घेऊन मनोहलाल खट्टर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. जेजेपीचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होते.
– भाजप आणि जेजेपीची युती मार्च 2024 मध्ये तुटली. यानंतर भाजपने खट्टर यांना हटवून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी नायब सैनी यांच्याकडे सोपवली.
– जेजेपीने पाठिंबा काढल्यावरही मुख्यमंत्री सैनी यांनी आपल्याला भाजपचे 41 आणि 7 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता.
पाऊस, सण-उत्सवांमुळे महाराष्ट्रातील निवडणूक लांबणीवर
जम्मू-कश्मीरमधील निवडणुकांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा यंत्रणा तसेच पाऊस आणि सण-उत्सव लक्षात घेता महाराष्ट्रात निवडणुका घेण्यास उशीर होत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात पाऊस असल्याकारणाने निवडणूक आयोगाचे बरेचसे काम राज्यात बाकी राहिले आहे. तसेच महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत बरेच सण-उत्सव आहेत, जसे की गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र, दिवाळी यामुळे तूर्त येथील निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नसल्याचे राजीव कुमार म्हणाले.