अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288, तर झारखंडमध्ये 81 जागा आहेत. ‘एएनआय’ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून यात निवडणुकीची घोषणा केली जाईल. त्यामुळे सर्वांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत.
Election Commission of India to announce the schedule for General Election to Legislative Assemblies of Maharashtra and Jharkhand 2024.
ECI to hold a press conference at 3:30 PM today. pic.twitter.com/yehIR0qUsm
— ANI (@ANI) October 15, 2024
जम्मू-कश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या वरचेवर सुरू असलेल्या बैठका आणि मतदारांना आकर्षित करणाऱ्या निर्णयांचा सरकारचा धडाका पाहता कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता होती.
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुरू असलेली धावळ लक्षात घेता आज निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी चर्चा होती. ही चर्चा खरी ठरली असून आज दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
दरम्यान, राजकीय पक्षांकडून जागावाटप, उमेदवार निश्चिती यासाठी बैठका सुरू आहेत. निवडणुकीच्या घोषणेची वेळ जसजशी जवळ येत आहे तशा राजकीय पक्षांच्या बैठकांचा जोर वाढला आहे. काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी राज्यातील नेते दिल्लीत पोहोचले आहेत. भाजपच्या नेत्यांच्याही दिल्लीत जोरबैठका सुरू आहेत.