मुख्यमंत्री योजना दूत थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा निधी थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महायुती सरकारला दिले आहेत. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक लाभांच्या योजना थांबवा, असे बजावतानाच ‘लाडकी बहीण’ योजनेचे नवीन अर्ज स्वीकारण्याचे कामही थांबवण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या या दोन्ही निर्णयांमुळे महायुती सरकारला चपराक बसली आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महायुती सरकारने इतर सर्व योजना बंद करून सर्व निधी या योजनेसाठी वळवला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसेही महिलांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र निवडणुकीची आचारसंहिता पूर्ण होईपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजनेला दिला जाणार निधी थांबवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. या योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारण्याचे कामही बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.