शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा – अजित पवार

ajit-pawar

 

ज्यांच्या वडिलांनी शिवसेना पक्ष स्थापन करत राज्यभर फिरून पक्ष वाढवला त्यांचाच पक्ष व चिन्ह दुसऱ्यांना बहाल करणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत सत्तांतर होण्यासाठी आता गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी महविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले.

प्रताप ढाकणे यांनी मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी पवार बोलत होते. या वेळी भगवानगड सह 46 गावांच्या पाणीयोजनेचे भूमिपूजन झाले असल्याचे जाहीर करण्यात आले. वीर सावरकर मैदानावर आयोजित केलेल्या या सभेच्या वेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार निलेश लंके, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, राहुल जगताप, पांडुरंग अभंग, शुभांगी पाटील, प्रताप ढाकणे, घनशाम शेलार, विनायक देशमुख, प्रा. शशिकांत गाडे, राजेंद्र फाळके, प्रभावती ढाकणे उपस्थित होते. या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करत मुंबई मध्ये मराठी माणसाला आधार दिला. जात धर्म न पाहता ड्रायव्हर,पानटपरीवाला व साखर कारखान्यात चिटबॉय म्हणून काम करणाऱ्याला मंत्रीपदे दिली. संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना वाढवण्यासाठी पिंजून काढला मात्र त्यांच्याच बाबतीत योग्य न्याय झाला नाही. पक्षात फूट पडत असते मात्र या बाबतीत जो निर्णय झाला तो सर्वसामान्य लोकांना रुचला नाही. सध्या महागाईने डोके वर काढले आहे, मात्र या विषयावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भावनिक मुद्दे बाहेर काढले जात आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांचे 22 पदे रिक्त असल्याने विकासकामावर परिणाम होत आहे. उद्या महिलादिन आहे या सरकारने एखाद्या तरी महिलेला मंत्रिपद द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तर या वेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की खेड येथे उद्धव ठाकरे साहेबांच्या झालेल्या सभेतील गर्दी अनेकांना झोंबली. या सभेला झालेली गर्दी पाहून एकनाथ शिंदे व रामदास कदम यांनी शिमगा केला. या सभेला झालेली गर्दी झारखंड, छत्तीसगड ची गर्दी नव्हती. गर्दी जमवण्याचे काम आम्ही करत नाही. लोक स्वतःहून येतात. सध्याच्या अधिवेशनात चार दिवस वाया घालवण्यात आले. भाजप च्या अनेक नेत्यांनी थोरपुरुषांच्या केलेल्या अवमानाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात एक शब्दही काढला नाही. एखाद्याला वापरून घ्यायचे अन सोडून द्यायचे ही भाजप ची नीती आहे. अडवाणी, सुषमा स्वराज यांच्या बाबतीत सुद्धा हेच झाले. स्व. गोपीनाथ मुंडे भाषण करत असताना फडणवीस टिपणे काढायचे आज त्याच फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना बाजूला सारण्याचे काम केले आहे. भाजप ज्या पक्षा सोबत राहतो त्यालाच संपवते. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यात फूट पाडली. महादेव जानकर कुठे आहेत ते कोणाला माहित नाही. नवनीत राणाच्या माध्यमातून बच्चू कडू यांना संपवण्याचा उद्योग चालू आहे. सुडाचे राजकारण करण्याचा उद्योग फडणवीस करत आहेत. राज्यात अनेक प्रश्न आहेत मात्र खोके घेऊन सत्तेवर आलेल्यांनी आपल्या पुढच्या पाच पिढ्यांचे कल्याण केले असल्याने त्यांना या प्रश्नाचे काही देणे घेणे नाही. शिंदे यांना आयोगा मधील फरक कळत नाही. फडणवीस त्यांच्या समोरचा माईक ओढून मीच सत्ता चालवतो असे दाखवून देत असल्याचे शेवटी अंधारे म्हणाल्या.