विधान परिषदेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक, 24 व 31 जानेवारी रोजी मतदान

1891
vidhan-bhavan

विधान परिषदेच्या 7 जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे तसेच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. या दोन जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली असून मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी 24 जानेवारी, तर सावंत यांच्या जागेसाठी 31 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जागांसाठी मतमोजणी अनुक्रमे 24 जानेवारी व 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस), तानाजी सावंत (शिवसेना), चंद्रकांत पाटील (भाजप), राहुल नार्वेकर (भाजप) हे विधानसभेवर निवडून आल्याने या चार जागा तर रामराव वडकुते (राष्ट्रवादी काँग्रेस), अमरीश पटेल (काँगेस) यांनी भाजपचा रस्ता धरल्याने तर चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या तीन जागा, अशा एकूण सात जागा  रिक्त झाल्या आहेत. धनंजय मुंडे हे 7 जुलै 2022 मध्ये तर तानाजी सावंत हे  5 डिसेंबर 2022 रोजी निवृत्त होणार होते, पण ते विधानसभेवर निवडून गेल्याने या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मुंडे हे विधानसभेतील आमदारांमार्फत तर सावंत हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विधान परिषदेवर निवडून गेले होते. आता या दोन्ही जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी 24 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून 24 जानेवारी रोजी मतमोजणी होईल, तर तानाजी सावंत यांच्या जागेसाठी 31 जानेवारी रोजी मतदान होऊन 4 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या दोन्ही जागी निवडून येणाऱ्या आमदारांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

रामराक वडकुते, राहुल नार्वेकर हे विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य होते, तर चंद्रकांत रघुवंशी हे विधानसभा आमदारांमार्फत व अमरीश पटेल धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत, चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ जुलै 2020 मध्ये संपत होता. त्यामुळे त्या जागी पोटनिवडणूक घेतली असती तर निवडून येणाऱ्या सदस्याला फक्त सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला असता. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. तर धुळे-नंदुरबार येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने अमरीश पटेल यांच्या रिक्त जागीही निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या