नागपूरमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी

45

नागपूर – नागपूर महानगरपालिकेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत तर प्रशासनही निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. या निवडणुकीकरिता शहरात २८०० बुथ तयार करण्यात येणार असून जवळपास १२ हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामात तैनात असतील, अशी माहिती सहायक आयुक्त (निवडणूक) महेश धामेचा यांनी दिली.

महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होत आहे़. शहरात ३८ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. एका प्रभागात तीन इतर सर्व प्रभागात चार वॉर्डाचा समावेश आहे. प्रभागातील प्रत्येक वॉडार्साठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असणार असून आयोगाने रंगही निश्चित करून दिले आहेत. मतदारांना त्यांच्या प्रभागातून चार नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे. मतदारांना त्यांचा प्रतिनिधी निवडताना अडचण होऊ नये म्हणून मतदान यंत्रावर प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र मतपत्रिका लावण्यात येणार असून त्यावर उमेदवाराचे नाव आणि चिन्हाचा तपशील असेल. निवडणूक आयोगाच्या यादीत एकूण ६२ निवडणूक चिन्हांचा समावेश आहे़. या निवडणुकीत तब्बल २८०० बुथ तयार करण्यात येणार असून एका बुथमध्ये ७५० ते ८०० मतदार असतील. तर, सर्व बुथमध्ये एकूण १२ हजार कर्मचारी तैनात असतील़. शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश नसेल. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, १२ तहसीलदार व १२ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़

महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक विभागातर्फे ३ हजार इव्हीएम मशीनची मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसात या इव्हीएम मशीन्स महापालिका निवडणूक विभागाकडे येतील. मशीन्स तपासण्याची प्रक्रिया करण्यात येत असून प्राप्त झालेल्या सर्व ईव्हीएम मशीन्स यशवंत स्टेडियम स्थित स्ट्राँगरूममध्ये सील करून ठेवण्यात येतील. मतदानाच्या आदल्या दिवशी मशीन्स बूथवर पाठविण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या