सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू राज्यात 43 हजार संस्था

राज्यातील निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या 43,104 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारकडून 31 मेपर्यंत स्थगिती दिली होती. आता ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आली होती त्या टप्प्यावरून ती पुढे सुरू होईल.

लोकसभेच्या निवडणूक पूर्वतयारी कामकाजासाठी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांच्या सेवा संबंधित जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे आणि सहकार विभागाकडील तालुका, जिल्हा व प्रादेशिक स्तरावरील अधिकारी-कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे निवडणुकीस पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गेल्या 28 फेब्रुवारीपासून थांबलेली सहकारी संस्थांच्या निवडणुकांची ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी नुकतीच पूर्ण झाली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता उठविल्याचे जाहीर करण्यात आले.

राज्यात 31 डिसेंबर 2023 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 93 हजार 342 सहकारी संस्थांपैकी 50 हजार 238 सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण झाली. 43 हजार 104 सहकारी संस्थांची निवडणूक होणे बाकी आहे. त्यामुळे या सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेस आता वेग येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे आडाखे बांधले जात आहेत. येथे आठवडाभरात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहेत.