नगरमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, राज्य शासनाच्या आदेशानंतर निर्णय

राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे आदेश येथील प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

नगर जिल्ह्यातील शहर बँक, मर्चंट बँक यांच्यासह 21 संस्थांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या आहे. दरम्यान शासनाचे आदेश आम्हाला प्राप्त झाले असून 21 संस्थांच्या निवडणुका या आता पुढे ढकलण्यात आले असल्याचे नगरचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सांगितले.

राज्यामध्ये सध्या परिस्थितीत 7143 इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणुकीचा कार्यक्रम हा सुरू करण्यात आला आहे. 7147 सहकारी संस्थांपैकी अ वर्ग 38, ब वर्ग 1170, क वर्गातील 3151 व ड वर्गातील 27 22 अशा संस्थांचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीमध्ये सुरू असल्याने गावागावांमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असून या वर्गातील सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांची संबंधित असल्यामुळे अनेक मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने आता राज्यातील 7751 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू केला असून दुसरीकडे 71 47 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा एकाच कालावधीत असल्यामुळे अ आणि ब वर्गाच्या निवडणुका या 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबतचे आदेश विशेष कार्यकारी अधिकारी व सहकारी निबंधक सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिलेल्या आदेशामध्ये म्हणले आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये सहकारी बँकांचा तसेच पतसंस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता अ व ब वर्गातील अशा एकूण 21 संस्था यामध्ये होत्या शहर सहकारी बँकेची तर निवडणूक ही सुरू झाली असून दिनांक 11 रोजी मतदान होणार होते, कालच चिन्हाचे वाटप करण्यात आलेले होते, तर दुसरीकडे नगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची मतदारांची प्रारूप यादी दोन दिवसापूर्वीच जाहीर करण्यात आलेले होते तर इतर संस्थांच्या सुद्धा निवडणुका या आठवड्यामध्ये होणार होत्या आजच येथील प्रशासनाला शासनाचे आदेश प्राप्त झाल्यामुळे दिनांक 20 तारखेपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सांगितले.