गदाना केंद्रातून चोरलेले विद्युत खांब जप्त

28

सामना प्रतिनिधी । रत्नपूर

तालुक्यातील गदाना येथील विद्युत उपकेंद्रावरून चोरून नेलेले सहा विद्युत खांब रत्नपूर पोलिसांनी जप्त केले. हे खांब चोरणाऱ्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.

तालुक्यातील गदाना येथील विद्युत उपकेंद्रावर भारत इलेक्ट्रिकल कंपनीतर्फे काम सुरू असून, येथून इलेक्ट्रिकलचे ३० हजार रूपयांचे सहा लोखंडी खांब चोरून नेल्याची घटना २६ फेब्रुवारी घडली होती. याबाबत रत्नपूर पोलीस ठाण्यात भारत इलेक्ट्रिकल कंपनीचे अभियंता केवल निमगोडा पाटील यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना चोरीचे सहा खांब असलेला आयशर ट्रक (एमएच १६ – एवाय३१६) हा संभाजीनगर नाक्यावर उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी नीळकंठ देवरे, प्रकाश मोहिते, रामनाथ भुसारे, रवींद्र सावळे, दीपेश शिरोडकर यांच्या पथकाने मंगळवारी ट्रक, त्यातील खांब व पाच आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात अमोल तुळशीराम खडप (रा.जवळगांव, ता.अंबाजोगाई, जि.बीड), संभाजीनगर येथील राजू रघुनाथ सरोदे (रा.अशोकनगर), गणेश बालाजी लांडगे, (रा.संजयनगर), जगन्नाथ सोनाजी ढोले, (रा.संजयनगर, मुकुंदवाडी), राजकुमार सुखवंत झरे (रा.बालकृष्णनगर, गारखेडा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून, या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नीळकंठ देवरे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या