प्लंबर, इलेक्ट्रीशियनही आता जीएसटीच्या कचाट्यात

973

स्वतंत्ररीत्या काम करणारे कामगार आतापर्यंत वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) टप्प्यात नव्हते. पण त्यांनाही लवकरच जीएसटी भरावा लागू शकतो. इलेक्ट्रीशियन, प्लंबर, ब्युटीशियन्स, फिटनेस ट्रेनर्सवर जीएसटीची कुऱ्हाड कोसळू शकते. या कामगारांना ऑनलाईन कामे देणाऱ्या कंपन्यांचे सहकार्य त्यासाठी केंद्र सरकार घेत आहे. जीएसटी नंबर असलेल्या कामगारांनाच कामे देण्याची सक्ती या कंपन्यांवर केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ऍन्ड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) हा विभाग यावर काम करत आहे. ऑनलाईन कामे देणाऱया अर्बनक्लॅप, हाऊसजॉय, ब्रोफॉरयू आदी वेबसाईटवरून ऑनलाईन कामे दिली जातात. देशातील लाखो कामगारांची अशा वेबसाईटवर नोंदणी आहे. काम असेल तर त्यांना ऑनलाईन कळवले जाते. अशा कामगारांना जीएसटीच्या टप्प्यात आणण्याचा सरकारचा विचार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

ऑनलाइन वेबसाईटवर नोंदणी केलेल्या बहुतांश कामगारांचे वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना जीएसटी द्यावा लागणार नाही असे डीपीआयआयटीमधील अधिकारी सांगतात. स्वतंत्ररीत्या काम करणाऱया कामगारांना इतर कामगारांच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार त्यांची माहिती जमा करत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

या कामगारांची माहितीच सरकारकडे नाही

सरकारकडे अशा कामगारांची काहीच माहिती नाही. हे कामगार लोकांच्या घरी जाऊन काम करतात आणि त्यांची ओळख पटवण्याचा इतर कोणताही मार्ग सरकारकडे नाही. त्यांना कदाचित जीएसटी द्यावा लागणार नाही, पण त्यानिमित्ताने त्यांची माहिती सरकारजमा होणार आहे, जेणेकरून भविष्यात काही गुन्हा किंवा दुर्घटना घडली तर संबंधित कामगाराला शोधणे सोपे होणार आहे.

सरकारचा ‘तिसरा डोळा’

ऑनलाईन वेबसाईटवरून कामे देणाऱया कंपन्यांना अशा कामगारांची इत्थंभूत माहिती ठेवण्याच्या सूचना सरकारने गोपनीयरीत्या दिल्या असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच या कामगारांवर सरकारचा ‘तिसरा डोळा’ राहणार आहे. या कामगारांनी कोणती कामे केली आहेत त्याचीही सविस्तर नोंद या कंपन्यांना ठेवावी लागणार आहे. या सूचना सरकारने अधिकृतरीत्या दिल्या नसल्याने या कंपन्या त्याबद्दल जाहीरपणे बोलण्यास तयार नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या