वीजपुरवठा खंडित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन, सात दिवसांत अहवाल देणार

मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात 12 ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने एकच हलकल्लोळ उडाला होता. या प्रकारामागे घातपात असल्याची शंका देखील ऊर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी व्यक्त केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणाही करण्यात आली होती. त्यानुसार आता आयआयटी मुंबईचे विद्यतु अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी ही समिती उपाययोजनाही सुचविणार आहे.

12 ऑक्टोबर रोजी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई क्षेत्रात तसेच उपनगरीय रेल्वेचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीजपुरवठा खंडित होण्यामागे नेमकी काय कारणे आहेत व अशा घटना भविष्यात होऊ नये याकरिता कोणत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे याचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सात दिवसांमध्ये या समितीला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये नागपूर व्ही.एन.आय.टी. मधील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. एम. व्ही. आवारे, व्ही.जे.टी.आय., मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. फारुख काझी, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे, आयआयटी मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी शाखेचे प्रा. एस. ए. सोमण सदस्य तर महावितरणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण हे सदस्य सचिव असणार आहेत. आयआयटी पवईतील विद्युत अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक अनिल पुलकर्णी हे या समितीचे निमंत्रित सदस्य आहेत.

मुंबईच्या अखंडित वीज पुरवठय़ासाठी यंत्रणा सुधारा!
मुंबई, ठाणे, नवी मुंबईचा परिसर 12 ऑक्टोबर रोजी अंधारात का गेला याबाबत नुसते आरोपप्रत्यारोप करू नका. भविष्यात मुंबईकरांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कच्चे दुवे शोधून वीज यंत्रणा सुधारा आशा शब्दात आज महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महापारेषणसह राज्य भार प्रेषण केंद्र व वीज वितरण कंपन्यांचे कान टोचले.

मुंबई, ठाण्याच्या खंडित वीज पुरवठय़ाची दखल घेत एमईआरसीने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती, त्यावर आज आयोगाचे सदस्य मुकेश खुल्लर, आय. एम. बोहरी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन सुनावणी झाली. यावेळी कळवा-पडघा सर्पिट एक देखभाल दुरुस्तीसाठी 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याची आम्ही राज्य भार प्रेषण केंद्राकडे (एसएलडीसी) परवानगी मागितली होती. ती एसएलडीसीने न दिल्यानेच 12 ऑक्टोबरला वहिनीत बिघाड झाल्याचे महापारेषणने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या