
सध्या बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन तत्वावर चालतात. त्यात खरेदी हा मुख्य भाग आहे. साध्या भाजीपाल्यापासून ते फर्निचरपर्यंत अनेक वस्तू आणि पदार्थ आपल्याला ऑनलाईन मागवता येतात. पण, आता लवकरच त्या यादीतून एक महत्त्वाचा घटक वगळला जाणार आहे. आता लवकरच ऑनलाइन औषधं मागवण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात ऑनलाइन औषधांची विक्री करणारे ई-फार्मसी ॲप्स बंद केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या गटाने आरोग्य मंत्रालयाला देशात ई-फार्मसी ॲप्स बंद करण्याचा सल्ला दिला आहे. याची कारणंही देण्यात आली आहेत. ई-फार्मसी ॲप्स आणि वेबसाइट्सवर औषधांची विक्री डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय केली जाते. कायदेशीररित्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकली जाऊ शकत नाहीत. तसंच, ई-फार्मसी ॲप्स चालवणाऱ्या कंपन्या रुग्णांच्या आरोग्याविषयी माहिती साठवून ठेवत आहेत. देशातील रुग्णांची ही माहिती जाहिरात कंपन्या आणि विदेशातील औषध कंपन्यांना विकली जात आहे.
या दोन मुख्य कारणांमुळे ई-फार्मसी कंपन्यांवर बंदी आणण्याची मागणी होत आहे. ई-फार्मा कंपन्यांना त्यांच्या या गैरव्यवहाराबद्दल याआधीच इशारा देण्यात आला होता. तरीही यात कोणतेही बदल न झाल्याने हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती आहे. 8 फेब्रुवारी रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने देशातील 20 ई-फार्मा कंपन्यांना नोटीस पाठवली होती. त्यात त्यांनी ई-फार्मा कंपन्यांना वैध परवान्याशिवाय ते औषधांची विक्री कशी करू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला होता. या नोटिसीला दोन दिवसांत उत्तर देणं अनिवार्य होतं. मात्र, या नोटिसीची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या नोटिसीतील अटींनुसारच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.