हत्तींच्या भीतीने लोकांनी झाडावर थाटले संसार

सामना ऑनलाईन। रांची

झारखंडची राजधानी रांचीजवळ हत्तींनी धूमाकूळ घातल्याने जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी चक्क उंच झाडांवरच आपले संसार थाटले आहेत. सध्या गावातील १५ कुटुंबांनी झाडावर आश्रय घेतला आहे. हत्तीच्या भीतीने ग्रामस्थांनी झाडावरुन खाली उतरणंच सोडून दिलय. मिळेल ते खायच नाहीतर उपाशी झोपायचं अशा परिस्थितीत ते दिवस कंठत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रांची-जमशेदपुर राष्ट्रीय महामार्गा लगतच्या गावांमध्ये हत्तींचे कळप दाखल झाले आहेत. आतापर्यत त्यांनी अनेक घर उध्वस्त केली असून शेतीचेही नुकसान केले आहे. या हत्तींना आवर घालण्यासाठी कुठलीही यंत्रणा तेथील शासनाकडे नसल्याने नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.

यामुळे अनेक कुटुंब गाव सोडून दुसऱ्या गावात स्थलांतरित झाली आहेत. मात्र काही जणांकडे दुसरा पर्यायच नसल्याने त्यांना आहे त्या परिस्थितीत गावात राहणे भाग आहे. पण कुठल्याही क्षणी हत्ती मनुष्य वस्तीवर हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे झाडांच्या टोकावर राहण्याची कल्पना काही तरुणांनी इतरांसमोर ठेवली . गावकऱ्यांना ती पटली त्यानंतर उंच झांडांवर झावळ्या, झाडाच्या फांद्या व फळ्या लावून ही घर उभारण्यात आली आहेत.