लग्न समारंभासाठी हिमाचलहून पंजाबला जात असताना पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना जैजॉन येथे घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील आठ जणांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण बेपत्ता आहेत. एकाला वाचवण्यास स्थानिकांना यश आले आहे. पंजाबपासून 34 किमी अंतरावर रविवारी ही घटना घडली. पंजाबमध्ये सर्वञ मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे.
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मेहतपूरजवळील डेहरा येथून पंजाबच्या एसबीएस नगर जिल्ह्यातील मेहरोवाल गावी सर्व कुटुंब लग्नासाठी चालले आहे. कारमध्ये कारचालकासह 12 जण होते. यादरम्यान मुसळधार पावसामुळे जैजॉन येथे नाल्याला पूर आला होता. स्थानिकांनी कारचालकाला नाला न ओलांडण्याचा सल्ला दिला. माञ त्याने दुर्लक्ष केले. चालकाचे नको ते धाडस 11 जणांच्या जीवावर बेतले.
दरम्यान, गाडीतील एकाला वाचवण्यास स्थानिकांना यश आले आहे. दीपक भाटिया असे या व्यक्तीचे नाव असून त्याला जैजॉन येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफचे एक पथक बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आले असल्याचे होशियारपूरचे उपायुक्त कोमल मित्तल यांनी सांगितले.
नाल्यातून पाच महिला आणि चार पुरुषांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले. सुरजीत भाटिया, त्यांची पत्नी परमजीत कौर, भाऊ सरूप चंद, मेहुणी बाईंडर, मेहतपूर येथील भटोली येथील शिन्नो, त्यांच्या मुली भावना आणि अनु, मुलगा हर्षित आणि चालक बिंदू अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.