केंद्राची राज्य सरकारवर कुरघोडी, एल्गार परिषदेचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला!

920

‘एल्गार परिषदे’चा तपास आज अचानक ‘एनआयए’कडे सोपवून केंद्र सरकारने राज्य सरकारवर कुरघोडी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

पुण्यात एल्गार परिषद झाल्यानंतर भीमा-कोरेगाव प्रकरण घडले होते. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासाचा आढावा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांनी घेतला होता. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि इतर वरिष्ठ अधिकारीही त्या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एल्गार परिषदेचा तपास पुणे पोलिसांकडून न करता एसआयटीकडून करावा, अशी मागणी केली होती. पवार यांच्या या मागणीनंतर काही तासांतच केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास ‘एनआयए’ करेल, असे जाहीर केले. त्यामुळे एका परीने केंद्र सरकारने टायमिंग साधत राज्य सरकारवर कुरघोडी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

पोलीस आणि कायदा-सुव्यवस्था हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. त्यावर केंद्र सरकारने अतिक्रमण केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे, तर केंद्र सरकार घाबरल्याचा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या