सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट इलॉन मस्कने गमावला, जाणून घ्या आता कोण आहे नंबर वन

सप्टेंबर 2021 पासून ट्विटर आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र इलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले नाहीत. फोर्ब्सच्या यादीनुसार, लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनची मूळ कंपनी LVMH चे मुख्य कार्यकारी बर्नार्ड अर्नॉल्ट यांचे कुटुंब आता संपत्तीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत ठरले आहे. अर्नॉल्ट कुटुंब 185.8 अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीसह फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम यादीनुसार, गुरुवार, 8 डिसेंबर रोजी सकाळी 8.45 वाजता, अरनॉल्ट कुटुंबाची संपत्ती मस्कपेक्षा जास्त होती, परंतु इलॉन मस्क वैयक्तिकरित्या 185.4 अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीसह अव्वलस्थानी राहिले.

सप्टेंबर 2021 पासून मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना हरवून त्यांनी हे स्थान मिळवले. आता मस्क 185.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली घसरण आणि ट्विटरवरील 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक यामुळे मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.

2022 मध्ये, इलॉन मस्कची एकूण संपत्ती 200 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. कारण टेस्लाचे शेअर्स दोन वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आले आहेत. मस्कने ट्विटर विकत घेण्याची घोषणा केल्यानंतर टेस्लाचे बाजार भांडवलही निम्मे झाले आहे. यामुळे मस्कच्या एकूण मालमत्तेत सुमारे 70 अब्ज डॉलरची घट झाली आहे. मस्क हे टेस्ला व्यतिरिक्त मस्क स्पेसएक्स आणि न्यूरालिंकचेही प्रमुख आहेत. न्यूरालिंक हे मानवी मेंदूला संगणकाशी जोडण्यासाठी अल्ट्रा-हाय बँडविड्थ ब्रेन-मशीन इंटरफेस विकसित करणारे स्टार्टअप आहे.

कोरोनानंतर इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला बाजारात अनेक आव्हानांना तोंड देत आहे. चीनमधील कठोर निर्बंधांमुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. टेस्लासाठी अमेरिकेनंतर चीन ही दुसरी मोठी बाजारपेठ आहे. पुरवठा साखळीतील अडचणींमुळे कंपनी अमेरिकेतही आपल्या गाड्या वेळेवर पोहोचवू शकत नाही. याचा फटका त्यांना बसला आहे.