एल्फिन्स्टन दुर्घटनेचा धडा घेणार का?

32

>>वैभव मोहन पाटील<<

परिस्थितीशी झगडत जीवन जगत असलेल्या मुंबईकरांवर शुक्रवारी काळाने पुन्हा एकदा झडप घातली. एल्फिन्स्टन रोड व परळ स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ पेक्षा अधिक मुंबईकरांचे जीव गेले व अनेक जण गंभीर झाले. एखाद्या अतिरेकी हल्ल्यासारखी किंवा बॉम्बस्फोटापेक्षा कमी धक्कादायक ही घटना नाही. शॉर्टसर्किटची अफवा पसरल्याने जीव गेल्याचे अनेकांचे म्हणणे असले तरी याला कारणीभूत परळ-एल्फिन्स्टनला जोडणारा अरुंद पूलच आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास बाहेर जोरदार पडणाऱ्या पावसामुळे अनेक प्रवासी या ब्रिजवरच दाटीवाटीने उभे होते. त्यात पश्चिम मार्गावरील एल्फिन्स्टन व मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात एकाच वेळी लोकल आल्याने या दोन लोकलमधील प्रवाशांची गर्दी पुलावर वाढत गेली. या गर्दीत काही प्रवासी व महिला तोल जाऊन खाली पडल्या. त्यांच्यावरून प्रवासी जात असल्याने चेंगराचेंगरी सुरू झाली. पुलाची एक बाजू पत्र्याने तर दुसरी बाजू लोखंडी ग्रिलने बंद असल्याने प्रचंड रेटारेटीत प्रवाशांना कुठेही उडय़ा मारून वा घुसून बाहेर पडण्याची संधीच नव्हती. त्यामुळे अनेक जण दाबले गेले, काही जण खाली पडले, त्यांच्यावरून इतर प्रवासी गेले तर अनेक जण अक्षरशः गुदमरून गेले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेली या दुर्दैवी घटनेची छायाचित्रे व व्हिडीओ अगदी सुन्न करणारे होते. बघतानाही अंगावर काटा उभा राहावा अशीच ही दृश्ये होती. मुंबईकरांचे जीवन किती अधांतरी झाले आहे याची प्रचीती या दुर्घटनेनंतर आली. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला प्रवासादरम्यान कुठल्या तरी रूपात अशा अनिष्ट घटनांना सामोरे जावे लागले आहे. त्यात दररोज कुठे ना कुठे बळी जात आहेत, तर जखमी होणाऱ्यांची मोजदादच नाही. मात्र अरुंद रेल्वे पुलामुळे इतक्या मोठय़ा संख्येने प्रवाशांचे जीव जाण्याची रेल्वे अपघातांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. असे अनेक पूल मुंबई व उपनगरांतील अनेक रेल्वे स्थानकांवर आहेत. त्यांचा त्रास व त्यामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय प्रशासनास दिसत नसेल असे म्हणणे हास्यास्पद आहे. नेहमीप्रमाणे सकाळी कामावर निघालेला मुंबईकर तसाही जीव मुठीत धरूनच प्रवास करतो. मात्र अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू असलेला पाऊस व अरुंद पूल आपला जीव घेईल याची त्याला सुतराम कल्पनाही नसेल. मुंबई ते गुजरातमधील अहमदाबाद शहराला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनचा घाट घातला जात असताना मुंबई लोकलमधील प्रवास किती घातक आहे याची प्रचीती शुक्रवारच्या घटनेने आली. दररोज मुंबईत आदळणारे लोकांचे लोंढे व त्याचा लोकल सेवेवर पडत असलेला ताण यामुळे आधीच गुदमरलेला मुंबईकर कदाचित या अपघाताचा धक्कादेखील पचवील. मात्र या घटनेत जीव गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांच्या भावना काय असतील याची कल्पनाही करवत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडत असलेला मुंबईकर उद्या त्याच आवेशात एल्फिन्स्टन पुलावरून रोजच्याच सवयीने उतरणार आहे. कारण इथे मरण स्वस्त झाले असले तरी कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या मुंबईकराला या मृत्यूचे भय नाही. सातत्याने घडत असलेल्या रेल्वे अपघातांनंतरही रेल्वे प्रशासनास जाग न येण्याची कारणे शोधण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. रोजच्या अपघातासारखा हाही एक अपघात समजून कदाचित त्याचे विस्मरणही होईल. एखादी चौकशी समिती वा निलंबन हे सोपस्कारही पार पडतील. मात्र उपाययोजनांचे काय याचे उत्तर सामान्य मुंबईकरास मिळायलाच हवे. तो त्याचा हक्कच आहे, पण ‘मी’ पण जपणाऱ्या मुंबईकराला केवळ मला काय त्याचे? या एकाच प्रश्नामुळे या अधिकाराचा विसर पडला असावा. आमच्यात न जागरुकता आहे ना सामाजिक संवेदना. माणुसकी हरवलेल्या समाजात स्वरक्षण व अधिकार मिळवण्यासाठी मोठय़ा प्रबोधनाची गरज आहे. मात्र समाजाच्या जीवावर सत्ता उपभोगणारी राजकीय व्यवस्था हे घडू देणार नाही. कारण सामाजिक प्रबोधनाचा व संवेदनशील मने निर्माण करण्याचा पायाच कमकुवत आहे. एल्फिन्स्टन पुलावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र या घटनेतून बोध घेऊन रेल्वे प्रशासनाला प्रवासी हिताच्या आवश्यक उपाययोजना करण्यासाठी तसेच लोकांना आपल्या न्याय्य व हक्कांसाठी आवाज उठवण्याची क्षमता ईश्वर प्रदान करो हीच अपेक्षा!

आपली प्रतिक्रिया द्या