तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोच्या विमानाचे दाबोळीवर इमर्जन्सी लँडींग

32

सामना प्रतिनिधी । पणजी

दाबोळी विमानतळावरून 180 प्रवाशांना अहमदाबादला घेऊन जाण्यासाठी उड्डाण केलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर अचानक उतरवावे लागले. हे विमान रत्नागिरीपर्यंत पोहचले होते. विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याचे संकेत वैमानिकांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने दाबोळी विमानतळावरील ‘एटीसी’ विभागाशी संपर्क साधून विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरवले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 3.50 वाजता दाबोळी विमानतळावरून इंडिगो एअरलाइंन्स चे ‘6 इ 162’ विमान 180 प्रवाशांना घेऊन गुजरातमधील अहमदाबादला जाण्यासाठी रवाना झाले. हे विमान रत्नागिरीपर्यंत पोचले असता विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे संकेत वैमानिकाला मिळाले.त्यांतर वैमानिकाने तातडीने दाबोळी विमानतळावरील ‘एटीसी’ विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर दाबोळी विमानतळावर अग्निशामक दलाच्या जवानांनी व इतर सुरक्षा यंत्रणांनी उड्डाणपट्टीच्या क्षेत्रात सुररक्षात्मक उपाय योजले. त्यांतर वैमानिकाला विमान दाबोळी विमानतळावर उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली.

या विमानातील प्रवासी तसेच कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली. दरम्यान या विमानाच्या इंजिनात झालेल्या तांत्रिक बिघाडाची तपासणी इंडीगो विमानाच्या अभियंत्यांकडून करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानात निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर हे विमान 180 प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावरून अहमदाबाद जाण्यासाठी रवाना होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या