अत्यावश्यक सेवा देणारे बँक कर्मचारी वाऱ्यावर, उपाययोजनांसाठी पावले उचलण्याची मागणी

586
प्रातिनिधीक फोटो

कोरोनाच्या प्रादुर्भावात दररोज कामावर हजर राहून ग्राहकांना अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने वार्यावर सोडले आहे, असा आरोप इंडियन नॅशनल बँक अॅम्पॉलॉईज फेडरेशनने केला आहे.

कंन्टेनमेंट झोनमध्ये असलेल्या बँक शाखांमध्ये काम करण्यासाठी दररोज प्रवास करून येणारे बँक कर्मचारी तेथील ग्राहकांशी व्यवहार करीत असून यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर इतर कोरोना योद्धांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोईसुविधा मिळत नाही. त्यांना दररोज कामावर येण्याची सक्ती केली जात असून त्यांच्या वेतनातही अनियमितता आहे. बँक कर्मचाऱ्यांना सोईसुविधा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी बँक अॅप्लॉईज फेडरेशनने केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठविले आहे.

बँक कर्मचारी समर्पित भावनेने ग्राहकांना सेवा देत असून कोरोनाची लागण होणाऱ्या आणि बळी जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची संख्या अन्य कोरोना वॉरियर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपेक्षा कमी नाही. बँक कर्मचारी कोणत्याही कौतुकाशिवाय आणि प्रसिद्धीशिवाय आपले कर्तव्य बजावत असून सरकारने बँक कर्मचाऱ्यांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी फेडरेशनचे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी केली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या बँक कर्मचाऱ्यांना २० ते ५० लाख रूपयांपर्यत नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्यांमध्ये हा भेदभाव का, यामध्ये सुसूत्रता असावी असेही फेडरेशनचे म्हणणे आहे.

मध्यवर्ती टास्क फोर्सची स्थापना करा
आयसीएमआरच्या निर्देशानुसार कामाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन करणे, ऑक्सीमीटर वापरणे, मास्कचा वापर, थर्मल स्कॅनिंग या गोष्टींचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याच शाखांमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बँकांसाठी मध्यवर्ती टास्क फोर्सची स्थापना करून सुरक्षेच्या उपाययोजना आखण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. तसेच जे कर्मचारी स्वखर्चाने वाहतुकीचे साधन वापरून कामावर हजर राहत आहेत त्यांना पुरेशी भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या