हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेटचे युद्ध शनिवारी (दि. 19) इमर्जिंग आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगणार आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानच्या युवा संघाकडून या स्पर्धेत देशवासीयांना विजेतेपदाची अपेक्षा आहे.
इमर्जिंग आशिया चषक स्पर्धा ओमानमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. त्यात हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश, ओमान, यूएई, अफगाणिस्तान, हाँगकाँग, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. 18 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यातील लढतीने स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. ‘अ’ गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका हे संघ असून, ‘ब’ गटात हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश आणि यूएई या देशांचा समावेश आहे.
हिंदुस्थानचा युवा संघ 19 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया 21 ऑक्टोबरला यूएई आणि 23 ऑक्टोबरला यजमान ओमानविरुद्ध खेळणार आहे. गेल्या वेळी इमर्जिंग आशिया चषकात पाकिस्तानच्या युवा संघाने अंतिम फेरीत हिंदुस्थानचा पराभव करून विजेतेपद पटकावीले होते.