‘स्वस्त’ अंतराळ सफर

52

[email protected]

अवकाशात विहार करण्याचे मनसुबे आता केवळ संशोधकांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. १९५७ मध्ये रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह ‘स्पुटनिक’ अवकाशात सोडला. त्याला येत्या ऑक्टोबरात साठ वर्षे पूर्ण होतील. या सहा दशकांच्या कालखंडात स्पेससायन्समध्ये प्रचंड प्रगती झाली. त्याची गतीही वाढली आणि मग चंद्रावतरण, मंगळ मोहिमा, गुरू-शनी या ग्रहांचा जवळून अभ्यास अशी कितीतरी स्वप्नं प्रत्यक्षात उतरली. व्हॉएजरसारखं यान तर सूर्यमालेच्याही पलीकडे गेलं.

माणसाला आता वेध लागलेत ते ‘कमर्शियल स्पेस फ्लाइट’चे. व्यावसायिक तत्त्वावर सर्वसामान्याला चार (!) पैसे खर्च करून थेट अवकाशात किंवा चंद्रावर वगैरे नेऊन आणण्याची अंतराळी स्वप्नं अनेकांना पडतायत आणि सत्यात उतरवण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्ची घातले जातायत. अमेरिकेतल्या स्पेस – एक्स एजन्सीने तर अवकाशवारीचा ध्यासच घेतला आहे. त्यासाठी पुनः पुन्हा वापरता येईल असं रॉकेट बनवून खर्च कसा वाचवता येईल यावर संशोधन सुरू आहे.

त्याला प्राथमिक यशही आलेलं दिसतंय. ‘स्पेस-एक्स’चे सीओ एलन मस्क यांनी तर वेगवान, पुनर्वापर करता येणारी आणि कमी खर्चाची अंतराळयात्रा घडविण्याचा विडाच उचललेला दिसतो. खर्च आटोक्यात आला की, अंतराळ-प्रवास जगातल्या बऱयाच लोकांच्या खिशाला परवडेल आणि मंगळावर वसाहत झाली तरी तिथे ये-जा करणं सोयीचं होईल असं मस्क यांना वाटतं.

त्यादृष्टीने त्यांच्या स्पेस-एक्सने एक यशस्वी प्रयोग नुकताच केला. २०१६च्या एप्रिल महिन्यात म्हणजे गेल्या वर्षी ‘ड्रगन’ या मानवरहित अंतराळयानाच्या उड्डाणासाठी वापरलेला बूस्टर पुन्हा वापरून अवकाशयान सोडलं. या प्रयोगाच्या यशामुळे पुढच्या काळात वारंवार वापरता येणारी अवकाशयानं बनवता आली तर प्रवास खर्च खूप कमी होईल. रॉकेटच्या उड्डाणासाठी बूस्टरचा पुनर्वापर ही ऐतिहासिक घटना असल्याचं मस्क यांनी म्हटलंय ते खरंच आहे. ‘रॉकेटचे पुनर्वापर करता येणारे, कारचे सुटे भाग असतात तसेच सुटे भाग बनवता आले की, आम्हाला ध्येय गाठल्यासारखं वाटेल’ असं मस्क यांनी म्हटलंय. त्यामुळे रियुजेबल बूस्टर हा संपूर्ण ‘स्पेस-इंडस्ट्री’साठी विलक्षण क्षण आहे असं मस्क यांना वाटतं.

रॉकेट बूस्टरचा खर्च अंतराळ प्रवासाच्या खर्चात सर्वाधिक असतो. तोच कमी झाला तर या प्रवासात क्रांती घडेल असं मस्क म्हणतात. त्यांच्या फाल्कन ९ रॉकेटच्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला आहे. अंतराळयानासाठीच्या रॉकेटमधील काही गोष्टींचा पुनर्वापर करून फाल्कन ९ ने खर्चात सहा कोटी डॉलर किंवा पूर्वीपेक्षा ३० टक्के बचत करणं ही उद्याच्या स्वस्त अंतराळ प्रवासासाठी आशादायी गोष्ट आहे.

‘स्पेस-एक्स’च्या या यशाबद्दल ‘नासा’नेही मस्क आणि मंडळींचं अभिनंदन केलं आहे. या दुसऱया उड्डाणात स्पेस-एक्सच्या रॉकेटने लक्झम्बर्ग या छोटय़ा देशाचा दळणवळण उपग्रह अंतराळात सोडण्यात यश प्राप्त केलं.

या प्रकारच्या खर्च वाचविण्याच्या प्रयोगाचं यश उद्या मंगळावर वसाहत करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल असं मस्क म्हणतात. मंगळ वसाहतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं तर चंद्र आपल्या परसातलाच उपग्रह आहे, तिथे उद्याची जोडपी ‘मधुचंद्रा’लाही जाऊ शकतील. अंतराळ-प्रवास सर्वसामान्यांसाठी किती वेगवान आणि ‘अर्थ’पूर्ण यावर सारं अवलंबून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या