मतदान प्रशिक्षणाला दांडी ,200 कर्मचाऱयांवर गुन्हे दाखल होणार

सामना ऑनलाईन, ठाणे

मतदान प्रशिक्षणाला दांडी मारणाऱया कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा पडणार आहे.  मतदान प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱया 200 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अ, ब, क, ड अशा चार पॅनलचा एक प्रभाग याप्रमाणे 33 प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. पहिल्यांदाच चार पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असल्याने मतदानावेळी मतदारांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर विशेष भर दिला जात आहे. मात्र मुळात इलेक्शन डय़ुटी नकोच असा सूर लावत शेकडो कर्मचाऱयांनी या डय़ुटी रद्द करण्यासाठी अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज फेटाळून आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाला हजर राहण्याचे फर्मान सोडले होते. मात्र 200 कर्मचाऱयांनी या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे आज उघडकीस आले आहे.

गडकरी रंगायतन येथे मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दोन सत्रांमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिले सत्र तांत्रिक अडचणींमुळे बारगळले तर आजचे दुसरे सत्र कर्मचाऱ्यांच्या निरुत्साहामुळे ढेपाळले. आज सुमारे 1600 कर्मचाऱयांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र त्यापैकी तब्बल दोनशेहून अधिक कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे पालिका आयुक्त संतापले असून त्यांनी थेट या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, निकडणूक निर्णय अधिकारी अमोल यादक, उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त संजय निपाणे, माहिती क जनसंपर्क अधिकरी महेश राजदेरकर, सहायक आयुक्त संजय शिंदे, कार्यकारी अभियंता गोळे, अहिरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या