फ्रान्समध्ये विदेशी इमामांना बंदी, फुटीरतावाद रोखण्यासाठी राष्ट्रपती मेक्रॉन यांची धडक कारवाई

1052

धर्माच्या नावाखाली कट्टरतावाद आणि फुटीरतेचे शिक्षण दिले जात आहे. हे रोखण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मेक्रॉन यांनी ठोस पावले उचलली आहेत. इस्लामचे शिक्षण देण्यासाठी येणाऱया विदेशी इमाम आणि शिक्षकांना फ्रान्समध्ये प्रवेशबंदी केली आहे.

इस्लाम धर्माचे फ्रान्समध्ये कसे पालन करावे यासाठी इतर देशांचा हस्तक्षेप आम्हाला नको. काही विदेशी इमामांकडून फ्रान्समधील मुस्लिम विद्यार्थ्यांना कट्टरतेचे शिक्षण दिले जाते. फ्रान्सच्या धर्मनिरपेक्ष कायद्याविषयी कोणताही आदर राखला जात नाही. त्यामुळे प्रवेशबंदीचे पाऊल उचलल्याचे राष्ट्रपती मेक्रॉन यांनी स्पष्ट केले. फ्रान्समधील मुलहाऊस या शहरात राष्ट्रपती मेक्रॉन यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे मुलहाऊस हे मुस्लिमबहुल शहर आहे.

युरोपातील सर्वाधिक मुस्लिम संख्या फ्रान्समध्ये
युरोपमधील सर्वाधिक मुस्लिम संख्या असलेला देश फ्रान्स आहे. 60 लाख मुस्लिम फ्रान्समध्ये आहेत.
गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ल्याच्या घटना फ्रान्समध्ये घडल्या. 2015 मध्ये पॅरिसमधील हल्ल्यात 130 जण ठार झाले होते. या हल्ल्यामागे ‘इसिस’चे दहशतवादी होते.
स्थानिक मुस्लिम तरुणांची माथी भडकविण्याचा कट आखला जात असल्यामुळे राष्ट्रपतींनी बंदीचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.

काय आहे निर्णय?
फ्रान्समधील मुस्लिम समाजाला इस्लामचे शिक्षण मिळावे म्हणून 1977 साली सरकारने एक योजना आखली होती. त्यासाठी नऊ मुस्लिमबहुल देशांमधील इमाम, शिक्षकांना फ्रान्समध्ये प्रवेश देण्याबाबत करार करण्यात आला होता.
सध्या अल्जेरिया, टुनिशिया, मोरोक्को आणि तुर्कीमधील 300 इमाम दरवर्षी फ्रान्समध्ये भेट देतात आणि 80 हजार मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षण देतात, मात्र धार्मिक शिक्षण देतानाच फुटीरतेचे धडे दिले जात असल्याने आता ही योजना बंद झाली आहे.
फ्रान्स हा शांतताप्रिय देश आहे. आमचे येथे कायदे आहेत. फ्रान्सच्या भूमीवर प्रेम करणारे, फ्रेंच भाषा बोलणारे इमाम येथेच तयार करावेत असे राष्ट्रपतींनी फ्रेंच मुस्लिम कौन्सिलला म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या