पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचे लातूर जिल्हा कार्यालयासमोर बेमुदत धरणे

सामना प्रतिनिधी । लातूर

11 डिसेंबर 18 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना विशेष बाब म्हणून कंत्राटी पद्धतीने शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने तत्काळ परिपत्रक शासनाने काढावे या मागणीसाठी मंगळवारपासून लातूरच्या पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना जिल्हा शाखातर्फे लातूर जिल्हा कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

राज्यातील असंख्य पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत दोन दशकांपासून आंदेालने सुरु आहेत. 11 डिसेंबर 2018 रेाजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचा धोरणात्म निर्णय शासनाने घेतला आहे. पण त्याबाबतचा जीआर अथवा परिपत्रक अद्याप शासनाने काढलेले नाही.त्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे लातूर जिल्हा पदवीधरी अंशकालीन कर्मचार्‍यांनी लातूर जिल्हा कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकांनी बुधवारी अर्धनग्न होवून आपला रोष व्यक्त केला. या बेमुदत आंदोलनात आणखी अंशकालीन कर्मचारी सहभागी होणार आहेत. या अर्धनग्न आंदेालनाच्यावेळी जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी,जिल्हा उपाध्यक्ष डी.एन.शिंदे, सचिव संपत गंगथडे, सहसचिव दत्ता वायाळ, मुख्य संघटक विष्णु डोंजे, संघटक लहु शिंदे, सहसंघटक हनुमंत क्षीरसागर,कोषाध्यक्ष माबुद पठाण, सह कोषाध्यक्ष अनंत कुलकर्णी आदींचा समावेश होता.