‘बेस्ट’मध्ये ऑनड्युटी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना हक्काची नोकरी मिळणार

best-2
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘बेस्ट’ उपक्रमात काम करताना ऑनड्युटी मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना लवकरच हक्काची नोकरी मिळणार आहे. अशा प्रकरणातील गरजवंतांना तातडीने नोकरी देण्यासाठी कार्यवाही करा, असे निर्देश ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी प्रशासनाला दिले. यानंतर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यामुळे शेकडो जणांना फायदा होणार आहे.

‘बेस्ट’ उपक्रमाच्या वाहतूक आणि विद्युत विभागात गेल्या अनेक वर्षांपासून ऑनडय़ुटी मृत्यू झालेल्या शेकडो कर्मचाऱयांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. ऑनड्युटी काम करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना नोकरी देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेचे सुहास सामंत यांनी केला. त्यामुळे संबंधित कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे अशा प्रकरणांबाबत तातडीने निर्णय घेऊन संबंधितांना हक्काची नोकरी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी प्रशासनाला आदेश देताना निवृत्त कर्मचाऱयांची थकीत देणी लवकरात लवकर द्यावीत, ग्रॅच्युइटी मिळेपर्यंत त्यांना ‘बेस्ट’च्या भाड्याच्या घरातून बाहेर काढू नये असे निर्देश दिले.

कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या!
‘बेस्ट’ कर्मचारी जीव धोक्यात घालून मुंबईकरांना सेवा देण्यासाठी रात्रंदिवस काम करीत असतात. मात्र अनेक वेळा सुरक्षेच्या उपाययोजना उपलब्ध नसल्यामुळे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असल्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी निदर्शनास आणून दिले. वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी गमबूट, हॅण्डग्लोव्हजसह आवश्यक अद्ययावत तंत्रज्ञान पुरवा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या