जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे! उद्धव ठाकरेंनी मिंधे-फडणवीस सरकारला सुनावले

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमूदत संपावर गेले आहेत. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे-फडणवीस सरकारला कडक शब्दात फटकारलं आहे. जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे! अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मिंधे-फडणवीस सरकारला सुनावलं आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला टाळे ठोकले आहे. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? मुख्य म्हणजे इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी. सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मग फडणविस-मिंधे सरकार या बाबत आट्या पाट्या का खेळत आहे? जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे!’