कर्मचाऱयांना मिळणार आठ लाखांपर्यंतचा ट्रान्सफर भत्ता, इन्फोसिसची भन्नाट ऑफर

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने देशभरातील आपल्या कर्मचाऱयांसाठी एका विशेष ऑफरची घोषणा केली आहे. देशभरातील इन्फोसिसच्या कार्यालयात ग्रेड 2 पदावर काम करणारे कर्मचारी जर कर्नाटकातील हुबळी येथील कार्यालयात दोन वर्षे कामासाठी शिफ्ट झाल्यास त्यांना जास्तीत जास्त आठ लाखांपर्यंतचा भत्ता मिळणार आहे. इन्फोसिसची ही ऑफर कंपनीतील सर्व कर्मचाऱयांसाठी नसून ग्रेड 2 आणि त्याखालील पदावर काम करणाऱया डेव्हलपमेंट सेंटरमधील कर्मचाऱयांसाठी आहे. या कर्मचाऱयांना प्रोजेक्ट डिलीव्हरी या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. देशातील छोटय़ा शहरांना आयटी हब बनविण्याचा इन्फोसिसचा विचार असून इंदूर, नवी मुंबई, नागपूर, कोईम्बतूर, हुबली या शहरांमध्ये इन्फोसिस भविष्यात आपली शाखा उघडणार आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात हुबळी येथे ट्रान्सफर होणाऱया कर्मचाऱयांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे.

या कर्मचाऱयांना ट्रान्सफर पॉलिसीचा लाभ

इन्फोसिसच्या ट्रान्सफर पॉलिसीनुसार ग्रेड 3 आणि त्याखाली काम करणाऱया कर्मचाऱयांनी हुबळी येथे ट्रान्सफर घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांनी 25 हजार रुपये रिलोकेशन भत्ता देण्यात येणार आहे. त्यानंतर दोन वर्षांपर्यंत दर सहा महिन्यांनी प्रत्येकी 25 हजार रुपये दिले जातील. अशा पद्धतीने या कर्मचाऱयांना एकूण 2 वर्षे काम केल्यावर 1.25 लाखांचा लाभ मिळेल. यावरील ग्रेडमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना दोन वर्षांत तब्बल 8 लाख रुपयांपर्यंतचा भत्ता मिळणार आहे.