सरकार मागच्या दाराने खासगीकरण आणत असून लाडक्या कंत्राटदारांसाठी सरकार बेरोजगारांच्या रोजगारावर गदा आणत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा शासन आदेश पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने काल 30 ऑगस्ट रोजी एक शासन आदेश काढला आहे. त्यानुसार विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील 2063 पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील 1145 पदे भरण्याचे कंत्राट पुण्यातील ज्या Bricks India Pvt. Ltd कंपनीला दिले आहे, याच कंत्राटदाराला वैद्यकीय शिक्षण विभागाचे कंत्राटी पद भरतीचे काम देखील नियम डावलून दिले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ही कंपनी कोणाची आहे? हा कंत्राटदार कोणाचा ‘लाडका’ आहे? याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळाले पाहिजे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.
शासनाच्या महिला व बालविकास विभागाने काल ३० ऑगस्ट रोजी एक शासन आदेश काढला आहे. त्यानुसार विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील २०६३ पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ११४५ पदे भरण्याचे कंत्राट पुण्यातील ज्या Bricks India Pvt. Ltd कंपनीला दिले आहे, याच… pic.twitter.com/woBnZJsEo7
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 31, 2024
या शासन आदेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, सरकार मागच्या दाराने खासगीकरण करीत आहे. राज्यातील बेरोजगार व्यक्तींच्या रोजगारावर लाडक्या कंत्राटदारांसाठी गदा आणली जात आहे. आमचे अगोदर पासून म्हणणे आहे की, हे सरकार गोरगरीब, शेतमजूर, सामान्य जनतेचे नसून बिल्डर आणि कंत्राटदारांचे आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली.