रोजगार कमी का झाला याचे कारण आमच्याकडे नाही! लोकसभेतील चर्चेत गंगवार गांगरले

406

बेरोजगारीच्या मुद्दय़ावर विरोधकांकडून घेरले जाण्याची चिन्हे दिसताच केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार हे सोमवारी लोकसभेत चांगलेच गांगरून गेले. देशातील रोजगार का घटला याचे कारण आमच्याकडे नाही, असे गोंधळलेले उत्तर त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी उपस्थित केलेल्या पुरवणी प्रश्नावर दिले. नोटाबंदीमुळेच देशातील नागरिकांच्या हातातला रोजगार गेल्याचा दावा विरोधकांनी केला.

पश्चिम बंगालमधील सेरामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले की, नोटाबंदीमुळे माझ्या मतदारसंघातील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. या कामगारांच्या पोटापाण्यासाठी सरकार काय पावले उचलणार आहे? त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना गंगवार यांची गोंधळाची स्थिती झाली. याचवेळी रोजगार कमी का झाला याचे कारण आमच्याकडे नसल्याचे सांगत त्यांनी बेरोजगारीपुढे हात टेकले. पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवतेय, असे ते म्हणाले.

रोजगारासाठी स्थलांतरित होण्याचा प्रत्येकाला हक्क

बेरोजगारीमागील कारण शोधण्यात अपयशी ठरलेल्या गंगवार यांनी रोजगार मिळवण्यासाठी स्थलांतरित होण्याचा मार्ग खुला असल्याचे सांगितले. देशाच्या कोणत्याही भागात रोजगाराच्या चांगल्या संधीसाठी स्थलांतरित होण्याचा प्रत्येक नागरिकाला संविधानाने हक्क दिला आहे, असे त्यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या