पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

24

सामना प्रतिनिधी । नागपूर

नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कुडमपार जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. विशेष नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना शुक्रवारी रात्री नक्षवाद्यांसोबत ही चकमक उडाली.

घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. २ फेब्रुवारीला जवानांचे पथक कुडमपार जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहिम राबवित होते. यावेळी पोलिसांना लक्ष करण्याच्या उद्देशाने जंगलात दबा धरुन असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही सतर्कता दाखवत नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.

पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर शोध घेतला असता, एक ३०३ रायफल, दोन १२ बोअर रायफल, ४ पिट्टू तसेच दैनंदिन वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सदर साहित्य जप्त करून या जंगल परिसरात नक्षलवाद्यांची शोध मोहीम अधिक तीव्र केल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या