लखनौ: ठाकुरगंजमधील घरात दहशतवादी शिरले

35

सामना ऑनलाईन । लखनौ

लखनौ शहरातील ठाकुरगंज येथे एका घरात तीन  दहशतवादी घुसले असून त्यांची उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाशी (एटीएस) मंगळवार दुपारपासून चकमक सुरू झाली आहे. एटीएसच्या जवानांनी या घराला घेराव घातला आहे. घरात घुसलेल्यांपैकी एका दहशतवाद्याचे नाव सैफुल असल्याचे सांगण्यात येत आहे. सैफुल याच्याकडे एके ४७ रायफल असून त्याने या घरातील एका खोलीत आसरा घेतला आहे. दरम्यान, या चकमकीमुळे लखनौ विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर हायअलर्टचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरात एका खासगी बसमधून उतरलेले हे तीन दहशतवादी ठाकुरगंज येथील हाजी कॉलनीत एका घरात घुसले. संशयीत दहशतवादी गोळीबार करीत असून त्याला एटीएस चोख प्रत्युत्तर देत आहे. घटनास्थळी एटीएसचे २० कमांडो तैनात असून एटीएस महानिरीक्षक असीम अरूण घटनास्थळी पोहोचले आहेत. दहशतवादी हाजी कॉलनी मशीदनजिक लपले असून ते गोळीबार करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लखनौ पोलीस ठाण्याच्या काकोरी क्षेत्रातील अंधेचौकी नजिकच्या हाजी कॉलनीत ही चकमक सुरू आहे. गोपनीय सूचना मिळाल्यानंतर एटीएसने दहशतवाद्यांनी पकडण्यासाठी परिसराची नाकेबंदी केली आहे. ही मोहीम डीजीपी जावीद अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर एटीएस महानिरीक्षक असीम अरूण या मोहिमेचे निरीक्षण करीत आहेत. चकमकीतील गोळीबारामुळे नागरिकांच्या जिवीताला धोका पोहोचू नये याची काळजी एटीएस घेत आहे. मंगळवार दुपारपासून ही चकमक सुरू आहे.

दरम्यान, भोपाळपासून १२० किलोमीटर अंतरावरील कालापीपल येथील जबडी रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी भोपाळ-उज्जैन पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र स्फोटात ९ प्रवाशी जखमी झाले आहेत. स्फोटाचं नेमकं कारण समजले नाही. मात्र या स्फोटाचा आणि लखनौ यथे दहशतवादी लपल्याच्या घटनेचा परस्परांशी संबध असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या