पुलवामात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद; एका दहशतवाद्याचा खात्मा

401

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. घटनास्थळी शस्त्रास्त्रेही सापडली आहेत. सुरक्षा दलाने परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम हाती घेतली आहे.

पुलवामा जिल्ह्यातील कमराजीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या भागाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलाने घेराव घातल्याचे समजताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. तसेच एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाला घटनास्थळाहून एक एके 47 रायफल, ग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी सापडला आहे. जम्मू कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. याआधी मंगळवारीही कुपवाडामध्ये सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या हिजबुल मुजाहिदीनचा एक दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या