
मुंबईतील शिवडी येथे राहणाऱ्या 84 वर्षीय महिलेला पक्षाघाताच्या झटका आणि वाचा गेली. पक्षाघाताकरिता अत्यावश्यक सेवेपासून स्पीच थेरपीपर्यत सर्व उपचार वेळेत मिळाल्याने आठच दिवसांमध्ये या महिलेने पक्षाघातावर आणि त्यामुळे आलेल्या मुकेपणावर विजय मिळवला.
शिवडीच्या रहिवाशी विमलादेवी अगरवाल यांना गेल्या आठवड्यात पक्षाघाताचा झटका आला. त्यांच्या कुटुंबियांना त्याचे फॅमिली फिजिशियन इंटरनल मेडिसीनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. किरण जैन यांच्या संपर्क साधला. पक्षाघाताची लक्षणे असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तातडीने त्यांना परेलच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल केले. विमलादेवी या ८४ वर्षाच्या असून त्यांना हृदयविकारसह दीर्घकालीन आजार आहेत. त्यांना पेसमेकर बसविला असल्याने एमआरआयही करणे शक्य नव्हते. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांना त्वरित निर्णय घेऊन सीटी स्कॅन केले. यामध्ये रक्तपुरवठा न झाल्याने पक्षाघाताचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. विमलादेवीया गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात दाखल झाल्या असल्या तरी त्यांना रक्त पातळ होण्याची औषधे आधीच सुरू असल्यामुळे थ्रोम्बोलायसिसचे उपचार करणे शक्य नव्हते. अखेर रुग्णालयातील वरिष्ठ न्युरोलॉजिस्ट डॉ. पंकज अगरवाल आणि वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रविण कुलकर्णी यांनी तातडीने दाखल करून उपचार सुरू केले. तसेच पक्षाघातामुळे लुळा झालेला भाग कार्यरत करण्यासाठी फिजियोथेरपी, स्पीच थेरपीही लगेचच सुरू करण्यात आली. परिणामी आठच दिवसांमध्ये त्यांची वाचा परत आली.
पक्षाघाताचे निदान वेळेत करणे अत्यंत गरजेचे आहे. या रुग्णाबाबत डॉ. जैन यांनी वेळेत निदान आणि उपचारासाठी रुग्णाला पाठविल्यामुळे आम्हाला तातडीने उपचार सुरू करणे शक्य झाले. या रुग्णांना उपचारासह योग्य निदानासाठी एमआरआय, सिटी स्कॅन यासारख्या चाचण्यांची आवश्यकता असते. पक्षाघातामुळे मेंदूमधील बोलण्याचा भागावर परिणाम झाला होता. त्यामुळे तिची वाचा गेली होती. रुग्णालयातील वरिष्ठ ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरेपीस्ट डॉ. पियुष गुजराथी यांना सहभागी करून घेत तातडीने उपचार सुरू केले. वेळेत उपचार आणि सोबतच स्पीच आणि स्वॅलो थेरपीसह पुनर्वसन थेरपी सुरू केल्याने रुग्णाचे बोलण्याच्या कौशल्यासह शरीराच्या इतर भागाचे कार्येही पुन्हा सुरळीत सुरु झाली, असे ग्लोबल रुग्णालयातील वरिष्ठ न्युरोलॉजिस्ट डॉ. पंकज अगरवाल यांनी सांगितले.
न्युरोलॉजी, हृदयविकार, स्पीच थेरपी असे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच रुग्णालयात उपलब्ध झाल्याने आणि गोल्डन अवरमध्ये उपचार सुरू झाल्याने वयस्कर आणि दीर्घकालीन आजार असूनही या महिलेची प्रकृती पूर्ववत होण्यात मदत झाली. वेळेत योग्य रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्यास पक्षाघातावर उपचार करणे, प्रतिबंध करणे आणि त्याच्याशी झगडा करणे शक्य आहे. तुमच्या जवळच्यापैकी कोणाला पक्षाघाताच झटका आल्यास सीटी, एमआरआय, कॅथलॅब यासारख्या निदान सुविधा उपलब्ध असणाऱ्या, रक्तातील गुठळी काढण्याची तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या घराजवळील रुग्णालयात त्वरित नेणे अत्यंत गरजेचे असल्याचे ग्लोबल रुग्णालयातील इंटरनल मेडिसीनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. किरण जैन यांनी अधोरेखित केले.
पक्षघात ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा आजार असून प्रौढांमधील मृत्यू आणि विकृतीचे एक प्रमुख कारण आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये पक्षाघाताचे प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. जसजसे व्यक्तीचे वय वाढते तसतसे त्यांना पक्षाघाताचा धोका वाढतो. अंदाजे ५० टक्के पक्षाघाताचा झटके हे 75 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना येतात तर 85 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांमध्ये हे प्रमाण ३० टक्के आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही याचा धोका समान आहे.